गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 13:37 IST2021-11-27T13:36:38+5:302021-11-27T13:37:46+5:30
भुसावळ : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करीत त्यांचा गळा दाबण्यात आला. भुसावळमधील श्रीराम नगरात ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली. याप्रकरणी निखिल राजपूत या गुन्हेगारासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर घायतड हे २७ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ गस्त घालत होते. त्याचवेळी निखिल राजपूत, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, आकाश पाटील, निलेश ठाकूर व एक अज्ञातांनी घायतड यांचा गळा दाबून हल्ला केला. तसेच शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये करीत आहे.