जळगाव : जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल प्रिन्स पॅलेससमोरून पायी जात असलेल्या १६ वर्षीय मुलाला भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना दि. ८ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसुंबा येथील अर्जून दिनकर कोळी (१६, मुळ रा. नांद्रा हवले ता.जामनेर) हा मुलगा मित्रांसोबत जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल प्रिन्ससमोरून ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास पायी जात होता. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने येणा-या एमएच.१९.सीवाय.५०५२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने अर्जुनला जोरदार धडक दिली. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला लागलीच रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, अपघातानंतर मालवाहतूक वाहन चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान, गुरूवारी अर्जूनचा मित्र ऋषीकेश समाधान कोळी याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार धडक देणा-या मालवाहू वाहन चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.