पक्षीय रणनीती बदलाचा ‘धुळे पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:47 PM2018-11-25T21:47:57+5:302018-11-25T21:48:03+5:30

नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्टÑवादी काँग्रेसऐवजी शिवसेनेशी युतीला प्राधान्य दिले होते; मात्र धुळे महापालिका निवडणुकीत ही रणनीती बदलली आहे. पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षीय रणनीतीमध्ये बदल झाला आहे.

Party strategy change 'Dhule pattern' | पक्षीय रणनीती बदलाचा ‘धुळे पॅटर्न’

पक्षीय रणनीती बदलाचा ‘धुळे पॅटर्न’

Next

मिलींद कुलकर्णी
नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्टÑवादी काँग्रेसऐवजी शिवसेनेशी युतीला प्राधान्य दिले होते; मात्र धुळे महापालिका निवडणुकीत ही रणनीती बदलली आहे. पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षीय रणनीतीमध्ये बदल झाला आहे.
@२०१४ च्या मोदी लाटेने प्रभावीत होऊन अनेक पक्षांमधील मंडळी भाजपामध्ये सामील झाली. त्यापैकी विजयी झालेली मंडळी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि धुळ्यात भाजपाने अनिल गोटे यांना दिलेल्या वागणुकीविषयी लक्ष ठेवून आहेत. गोटे यांनी भाजपामधील सर्व आमदारांना पाठविलेल्या खुल्या पत्राचा परिणाम काही अंशी तरी झाला आहे. ते दृश्य स्वरुपात पुढीलवर्षी दिसू लागतील. रणनीती बदलण्याशिवाय भाजपाला आता पर्याय नाही.
जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेशदादा जैन यांनी भाजपाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपाने तो नाकारुन स्वबळावर सत्ता हस्तगत केली. धुळ्यात वेगळी परिस्थिती निर्माण झाली. भाजपाच्या स्थानिक आमदारांनी पक्षाविरुध्द बंड करुन लोकसंग्राम संघटनेतर्फे निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपा विरुध्द भाजपा असा सामना तिथे रंगणार आहे. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील बहुजन वंचित आघाडीचे अस्तित्व काय आहे, त्याची चाचणीदेखील या निवडणुकीत घेतली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. प्रत्येक लढाईत त्यांनी वेगवेगळे युध्दतंत्र वापरले. परंतु, आपल्या लक्षात राहिले ते केवळ गनिमी कावा. पण हा गनिमी कावा हा अनेक तंत्रांपैकी एक होता हे महाराजांचे चरित्र वाचले तरी आपल्याला लक्षात येईल. कोणतेही तंत्र त्यांनी सातत्याने वापरलेले नाही. शत्रू कोण, भौगोलिक परिस्थिती काय, हवामान, दाणापाण्याची व्यवस्था असा सर्वांगिण विचार करुन ते रणनीती ठरवत असत. ऐनवेळच्या परिस्थितीनुसार निकटच्या सहकाऱ्यांशी मसलत करीत ते रणनीतीमध्ये बदल करीत असत. त्यामुळे प्रचंड फौजा असलेल्या मोगलांविरुध्द त्यांनी यशस्वी झुंज दिली.
महाराजांच्या रणनीतीची आठवण होण्याचे कारण म्हणजे भारतीय राजकारण हेदेखील रणभूमी झाली आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा शंखनाद मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी झाला आहे. खान्देशचा विचार केला तर धुळे महापालिका निवडणुकीमुळे एकूण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष महाराजांच्या रणनीतीला अनुसरुन काही प्रमाणात योजना आखत असल्याचे दिसून येते.
‘संकटमोचक’ बिरुदावली भूषविणारे गिरीश महाजन हे धुळे महापालिका निवडणुकीच्या पटलावरुन आठवड्यापासून गायब होणे, हा भाजपाच्या रणनीतीचा भाग म्हणायचा काय? पालघर, जामनेर आणि जळगावनंतर भाजपाने त्यांच्याकडे धुळ्याची जबाबदारी दिली. तीन ठिकाणी वापरलेले युध्दतंत्र धुळ्यात चालेल ही अपेक्षा सुरुवातीलाच फोल ठरली. स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता महाजन यांचे नेतृत्व लादण्यात आले आणि स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांनी या नेतृत्वाला आव्हान दिले. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे शहरात निवडणूक असताना पक्षाने आमदार म्हणून मला विश्वासात न घेता जळगावहून मंत्र्यांचे नेतृत्व लादणे; पुण्यापासून तर जळगावपर्यंतचा पॅटर्न म्हणजे प्रतिस्पर्धी पक्षातील सर्वदृष्टया सक्षम उमेदवारांना आयात करुन सत्तासंपादन करणे, सत्तेचा फायदा घेत प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करणे हे मुद्दे उपस्थित करुन धुळेकरांमध्ये स्वत:ला नायक तर भाजपाला खलनायक म्हणून प्रतिमानिर्मितीचा प्रयत्न गोटे यांनी केला. भाजपा नेतृत्वाला गोटे यांच्या रणनीतीचा पुरेसा अंदाज न आल्याने आठवडाभर पक्षाच्या गोटात सामसूम होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेत गिरीश महाजन यांनी केलेली ‘धुळे मुक्कामा’ची घोषणा देखील फलद्रूप झाली नाही. अखेर भाजपाने रणनीतीत आता बदल केलेला दिसून येत आहे. महाजन यांच्याऐवजी त्यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना चाल दिली आहे. यापूर्वी गोटे यांच्या टीकेला उत्तर न देणारे किंवा दुर्लक्ष करणारे भाजपा नेते आता पत्रकार परिषदा घेऊन प्रतिवाद करु लागले आहेत. डॉ.भामरे यांच्या दोन पत्रकार परिषदा या आठवड्यात झाल्या आणि त्यांनी गोटेंच्या टीकेचा मुद्देसूद समाचार घेतला. भाजपाच्या रणनीतीच्या बदलाला आता गोटे कसे सामोरे जातात, हे पहायचे.
कॉंग्रेस-राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षानेही २०१९ ची तयारी यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहिले असल्याचे जाणवत आहे. खान्देशात संघर्ष यात्रेच्यानिमित्ताने दोन्ही कॉंग्रेसचे नेते एकत्र आले. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्माण झालेली कटुता पुरेशी दूर झालेली नाही. जळगावात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची कामगिरी सुमार राहिली असली तरी एकमेकांवर दोषारोप झाले. नंदुरबारात काँग्रेसने भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेची मदत घेतली. परंतु, राष्टÑवादी काँग्रेसला जवळ घेतलेले नाही. स्थानिक परिस्थितीनुसार हे निर्णय झाले आहेत. धुळ्यात त्या मानाने दोन्ही कॉंग्रेसमध्ये संवाद आणि समन्वयाचे वातावरण आहे. जिल्हा बँकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवली आणि विजय मिळविला. अमरीशभाई पटेल आणि राजवर्धन कदमबांडे यांचे पक्ष वेगळे असले तरी चांगले सख्य आहे. आमदार कुणाल पाटील या काँग्रेसच्या तरुण आणि उमद्या आमदारामुळे आघाडीत सुसंवादाचे वातावरण तयार झाले आहे. गुंडगिरीचा आरोप असलेले बहुसंख्य नगरसेवक आणि उमेदवार भाजपाने पळविल्याने आघाडीने गोटेंचाच मुद्दा पुढे रेटला आहे. ‘साम-दाम-दंड-भेद’ ही रणनीती भाजपा वापरत असल्याच्या गोटे यांच्या आरोपात आघाडीनेही सूर मिसळला आहे.
धुळेकर काय निर्णय देतात किंवा पाच राज्यात काय होते, यावर २०१९ ची रणनीती पुन्हा निश्चित होईल. यशापयशाचा ताळेबंद मांडला जाईल. परंतु, गोटे यांच्या नव्या भूमिकेमुळे भाजपामध्ये पाच वर्षांपूर्वी आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्यास बाध्य केले आहे, हे मात्र निश्चित म्हणावे लागेल. ‘आयारामां’च्या भरवशावर महासंग्राम लढायचा काय, याविषयी भाजपालादेखील नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
गुरुबंधूंच्या लीला
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा देदीप्यमान यश मिळवित असताना नेमके खडसे गटाचे उमेदवार कसे पराभूत होतात, हे कळण्यासाठी बुध्दीला फार ताण देण्याची आवश्यकता नाही. जळगावचा धडा लक्षात घेऊन खडसे यांचे ‘गुरुबंधू’ असलेल्या अनिल गोटे यांना भाजपाच्या दगाफटक्याची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी स्वत:च्या उमेदवारांची तयारी करुन ठेवली होती. लोकसंग्रामकडून त्यांनी उमेदवार उभे करुन आव्हान निर्माण केले आहेच.

Web Title: Party strategy change 'Dhule pattern'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.