बदलीपात्र पोलिसांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:05+5:302021-07-30T04:18:05+5:30
जळगाव : बदलीपात्र पोलिसांची संख्या आता १५ वरुन २५ टक्के झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील ४८२ वरुन पुढे ...

बदलीपात्र पोलिसांची संख्या वाढली
जळगाव : बदलीपात्र पोलिसांची संख्या आता १५ वरुन २५ टक्के झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील ४८२ वरुन पुढे सरकला आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी जारी केला. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयची असून विशेष कारणास्तव बदल्या या १० ते ३० ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.
पूर्वीच्या १५ टक्के आदेशाप्रमाणे ४८२ कर्मचारी बदली पात्र होते. परंतु ज्यांच्या कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची संख्या ६५२ इतकी होते आहे. नव्या आदेशाप्रमाणे बहुतांश जणांच्या बदल्या होऊ शकतील. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त पदांवरच विशेष कारणास्तव बदल्या करता येणार आहेत. जे पद रिक्त नाही अशा पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.
कोविड-१९ चे कारण व तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन सरकारी विभागातील बदल्यांना ३० जूनपर्यंत देण्यात आलेली स्थगिती शासनाने या महिन्यात उठविली होती. मर्यादीत स्वरुपात १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत १८ कर्मचारी बदलीपात्र आहेत. त्याशिवाय जळगाव उपविभागात ११५ कर्मचारी बदलीपात्र आहेत. एलसीबीसाठीच सर्वाधिक शिफारसी व अर्ज आलेले आहेत. याआधी ज्याला संधी मिळालेली नाही, त्यातही ज्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे, अशांना एलसीबीत संधी दिली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बदलीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व क्रीम पोलीस ठाणे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. या उपविभागात शक्यतो आयपीएस अधिकारी नियुक्त होत नाही.