जळगाव : जिल्हा दूध संघातील भरती प्रक्रियेंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू झाले आहे. ३० सप्टेंबर रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना रुजू होण्यास सांगण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष कामावर रूजू होऊ शकणार आहेत.
जिल्हा दूध संघात अधिकारी वर्गासाठीच्या ३२, तर सहायक लिपिक वर्गाच्या १३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केले व त्यानंतर परीक्षा झाली. मात्र, या भरती प्रक्रियेवर दूध संघाच्या माजी कर्मचाऱ्यांनीच हरकत घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन १३२ जागांची भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षा दिलेल्या एकूण अडीच हजार उमेदवारांपैकी ६०० जण गुणाणुक्रमाने मुलाखतीस पात्र ठरले आहे.
२१ ते २२ सप्टेंबरपर्यंत मुलाखती
परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ८ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली आहे. यामध्ये एका जागेसाठी पाच जणांच्या मुलाखती घेण्यात येत असून दररोज ५० जणांच्या मुलाखती होत आहेत. २१ ते २२ सप्टेंबरपर्यंत या मुलाखती चालणार असल्याचा अंदाज आहे. या मुलाखतींनतर ३० सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे व उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल. त्यानंतर त्यांना रुजू होण्याची संधी देण्यात येणार असून साधारण ऑक्टोबर महिन्यात दूध संघातील १३२ जागांवर अधिकारी, कर्मचारी रुजू होतील.
जिल्हा दूध संघातील भरती प्रक्रियेंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी याचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाईल.
- मनोज लिमये, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ.