राज्यभर जळगावची बदनामी झाली, हा उठावडेपणा आहे; वसतीगृह प्रकरणावरुन एकनाथ खडसे आक्रमक 

By मुकेश चव्हाण | Published: March 5, 2021 01:10 PM2021-03-05T13:10:35+5:302021-03-05T13:12:22+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका केली आहे.

NCP leader Eknath Khadse has criticized BJP On Jalgaon Incident | राज्यभर जळगावची बदनामी झाली, हा उठावडेपणा आहे; वसतीगृह प्रकरणावरुन एकनाथ खडसे आक्रमक 

राज्यभर जळगावची बदनामी झाली, हा उठावडेपणा आहे; वसतीगृह प्रकरणावरुन एकनाथ खडसे आक्रमक 

Next

जळगाव/ मुंबई: जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. 

गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, जळगावातील कथित घटनेसंदर्भात विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.  

तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

बदनामी नको

शासकीय वसतिगृहात पीडित आणि घटस्फोटित महिला राहतात. त्यांच्यासंदर्भात अशा प्रकारे बदनामीकारक माहिती प्रसारित करणे योग्य नाही. जळगावातील आशादीप वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालविले जाते. ज्या महिलेने तक्रार केली, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, असे या खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले.

दोन जणींनी केली अन्यत्र हलविण्याची मागणी

आशादीप वसतिगृहात चौकशीदरम्यान तेथे असलेल्या गरोदर महिलांना काही त्रास होऊ नये, म्हणून अशा तीन महिलांना महिला निरीक्षणगृहात हलविण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी इतरही दोन मुलींना आम्हाला इतरत्र हलवा, अशी मागणी केली असताना त्यांनाही निरीक्षण गृहात हलविण्यात आले आहे. या पाच जणींना निरीक्षण गृहात हलविल्यानंतर वसतिगृहात सद्या १२ मुली आहेत.

Web Title: NCP leader Eknath Khadse has criticized BJP On Jalgaon Incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.