२०० क्षमतेच्या कारागृहात तब्बल ४३४ बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:58 PM2020-07-29T12:58:52+5:302020-07-29T12:59:04+5:30

सुनील पाटील । जळगाव : रक्षकाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून तीन बंद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर कारागृहाची सुरक्षा व इतर ...

As many as 434 inmates in the 200-capacity jail | २०० क्षमतेच्या कारागृहात तब्बल ४३४ बंदी

२०० क्षमतेच्या कारागृहात तब्बल ४३४ बंदी

Next

सुनील पाटील ।
जळगाव : रक्षकाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून तीन बंद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर कारागृहाची सुरक्षा व इतर बाबी ऐरणीवर आल्या आहेत. या कारागृहात नेमकी काय परिस्थिती आहे व उणिवा काय याची माहिती ‘लोकमत’ ने घेतली असता अनेक गंभीर प्रकार समोर आले.
२०० बंदीची क्षमता असताना या कारागृहात आजच्या तारखेत ४३४ बंदी आहेत. बंद्यांच्या तुलनेत नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळही नाही. खरे तर बंदींची संख्या लक्षात घेता १०० च्यावर सुरक्षा रक्षक व दहा अधिकारी असणे अपेक्षित असताना येथे प्रत्यक्षात आज फक्त ३७ जणांचे मनुष्यबळ आहे.

इतर कारागृहातून २६ पदे वर्ग
येथील कारागृहातील रिक्त पदे व बंद्यांची संख्या पाहता औरंगाबाद उपमहानिरीक्षकांनी पैठण कारागृहातून २० रक्षक, लातूर व धुळे येथून प्रत्येकी १ सुभेदार व ४ रक्षक जळगाव कारागृहात वर्ग केलेले आहेत, मात्र ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. हे आदेश फक्त कागदोपत्रीच आहेत. या कारागृहातून अनेक वेळा बंद्यांनी पलायन केले आहे, त्याशिवाय गंभीर गुन्ह्यातील बंद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी उपमहानिरीक्षक व महानिरीक्षकांनी भेटी दिलेल्या आहेत. येथील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतरही मनुष्यबळाची पूर्तता झालेली नाही.

-कारागृहात अधीक्षकासह ४१ पदे मंजूर आहेत. ही पदांची संख्या २०० बंदींसाठी आहे. येथे ४३४ बंदी असल्याने त्यातुलनेत मनुष्यबळ नगण्य आहे. त्यात देखील अनेक कर्मचारी वैद्यकिय तसेच इतर रजेवर असतात. मंगळवारी ५ कर्मचारी गैरहजर होते. बंद्यांची संख्या जास्त असल्याने एका बराकीत दुपटीने बंदींची व्यवस्था करावी लागत आहे. रात्र-अपरात्री काही घटना व अनुचित प्रकार घडल्यास कारागृह व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान शेजारीच असावे, अशी संकल्पना आहे. मात्र येथे फक्त १० कर्मचाऱ्यांची व्यवस्था होईल, असेच निवासस्थान आहे. ८० टक्के कर्मचारी शहरात वेगवेगळ्या भागात वास्तव्याला आहेत. कारागृहाच्या पाठीमागे गणेश नगर व ग्राहकमंचाच्या दिशेने असलेली जागा ही अतिक्रमीत आहे. या जागेत कर्मचारी निवासस्थान झाल्यास त्यांची सोय होईल व कारागृह तसेच निवासस्थान जवळ असावे या संकल्पनेचा हेतूही साध्य होऊ शकतो. हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारित असल्याने त्यांनीच यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

समितीची बैठकच नाही
कारागृहाच्या देखरेखीसाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली अभिविक्षक समिती कारागृहात गठीत करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक व इतर विभागाचे अधिकारी यात सदस्य असतात. दर तीन महिन्यांनी समितीच बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र येथे २०१९ पासून या समितीची बैठकच झालेली नाही.त्यामुळे कारागृहाच्या समस्याच निकाली निघालेल्या नाहीत.

तीन वर्षानंतर मिळाले अधीक्षक
तत्कालिन अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्यावर ६ मे २०१७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत या कारागृहाला नियमित अधीक्षक नव्हते. तुरुंग अधिकाºयांकडेच प्रभारी पदभार सोपविला जात होता. दर सहा महिन्यांनी येथून अधिकाºयांची उचलबांगडी झाली. आता उस्मानाबदचे अधीक्षक गजानन पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील हे मुळचे तांदलवाडी, ता.रावेर येथील मुळ रहिवाशी आहेत. याआधी त्यांनी मुंबई, औरंगाबाद, नाशिक,लातूर व उस्मानाबाद येथे काम केले आहे.

नवीन कारागृहाचा प्रस्ताव धुळखात
जिल्ह्याचा वाढता विस्तार, वाढती गुन्हेगारी व आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता भुसावळ येथे कुºहा रस्त्यावर १२५ एकर जागेत वर्ग १ चे कारागृह मंजूर झालेले आहे. जागा देखील ताब्यात घेण्यात आलेली आहे. मात्र या प्रकरणाला अद्याप चालना मिळालेली नाही. तत्कालिन अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्या काळात या प्रस्तावाला चालना मिळाली होती,आता हा प्रस्ताव धुळखात पडला आहे.

कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मनुष्यबळाबाबत देखील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव आधीच पाठविण्यात आला आहे. रुजू होऊन दोन दिवस झाले. येथील माहिती जाणून घेऊन चूक झालेल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. चुकीच्या कामांना अजिबात थारा नाही.अंतर्गत शिस्तही कडक करण्यात आलेली आहे. बंद्यांची नियमित आरोग्य तपासणी करुन प्रत्येकाची माहिती घेतली जात आहे.
-गजानन पाटील, अधीक्षक, कारागृह

Web Title: As many as 434 inmates in the 200-capacity jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.