जळगावात अवकाळीचा कहर, वीज पडून बैल ठार, तरुणही भाजला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 22:59 IST2025-05-12T22:57:13+5:302025-05-12T22:59:55+5:30

Jalgaon Unseasonal Rains: जळगावातील अमळनेर तालुक्यात वीज पडल्याने बैल ठार झाला असून एक तरूण थोडक्यात बचावला आहे.

Major damage due to unseasonal rains in Jalgaon | जळगावात अवकाळीचा कहर, वीज पडून बैल ठार, तरुणही भाजला!

जळगावात अवकाळीचा कहर, वीज पडून बैल ठार, तरुणही भाजला!

प्रशांत भदाणे, लोकमत न्यूज नेटवर्क:जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच आहे. सोमवारी (१२ मे २०२५) सायंकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमळनेर तालुक्यातील खर्दे गावाच्या शिवारात वीज पडून बैल ठार झाला. तर, २३ वर्षीय तरुण गंभीररीत्या भाजला. या घटनेत इतर तीन गुरे देखील भाजली आहेत.

राहुल राजेंद्र पावरा-बारेला, (वय २३, रा. खर्दे, ता. अमळनेर) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सालगडी म्हणून काम करतो. सोमवारी सायंकाळी खर्दे परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट देखील झाला. खर्दे येथे संभाजी पाटील यांच्या शेतात कुट्टी करण्याचे काम करत असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतात काम करणारा राहुल पावरा हा बैलगाड्याच्या खाली बसला. त्याचवेळी शेजारीच वीज पडल्याने तो भाजला. तर, बैलगाड्याला बांधलेल्या जनावरांपैकी एक बैल दगावला तर तीन गुरे भाजली.

या घटनेनंतर काही युवकांनी तातडीने जखमी झालेल्या राहुल पावरा याला १०८ रुग्णवाहिका बोलून उपचारासाठी अमळनेरला हलवले. अमळनेर शहरातील एका खाजगी रुग्णालय त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, हवालदार मुकेश साळुंखे, सहायक फौजदार फिरोज बागवान यांनी भेट दिली.

Web Title: Major damage due to unseasonal rains in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.