लक्झरी चार महिन्यांपासून बंद, दीड हजारावर जण बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 02:24 PM2020-08-23T14:24:39+5:302020-08-23T14:26:00+5:30

कोरोना संसर्गजन्य टाळण्यासाठी प्रवाशी वाहतूक बंदीमुळे २० मार्चपासून खासगी लक्झरी बसेस जागेवरच खिळल्या आहेत.

Luxury closed for four months, over one and a half thousand people unemployed | लक्झरी चार महिन्यांपासून बंद, दीड हजारावर जण बेरोजगार

लक्झरी चार महिन्यांपासून बंद, दीड हजारावर जण बेरोजगार

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात ९० कोटींचा फटकादीड हजार जणांचा रोजगार ठप्प२० मार्चपासून खासगी लक्झरी बसेस जागेवरच

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्गजन्य टाळण्यासाठी प्रवाशी वाहतूक बंदीमुळे २० मार्चपासून खासगी लक्झरी बसेस जागेवरच खिळल्या आहेत. चार महिन्यात खासगी बसेस बंद असल्याने जिल्ह्यातील प्रवाशी वाहतूक व्यवसायाला ९० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या १५०० जणांचा रोजगार ठप्प पडला आहे.
२० आॅगस्टपासून लालपरी रस्त्यांवर धावू लागली आहे, तर दुसरीकडे खासगी बसेस रस्त्यावर धावण्याबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. सुरवातीला सोशल डिस्टन्सिंग पाळून क्षमतेपेक्षा निम्मे प्रवाशांवर वाहतूक करण्यास तयार असलेल्या खासगी बस व्यावसायिकांची मागणी सुरक्षिततेच्या कारणाने शासनाने धुडकावून लावली. परिणामी तब्बल चार महिन्यांपासून लक्झरी बसचे चाक फिरलेच नाही.
१५० लक्झरी बस खिळल्या
कोरोना संसर्गजन्य आजाराने खासगी लक्झरी बस व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातून पुण्यासाठी ९०, मुंबई ३०, नागपूर, सुरत, बडोदा इंदूर व हैदराबादसाठी एकूण ३० अशा १५० बसगाड्या चार महिन्यांपासून जागेवरच खिळल्या आहेत. यामुळे दर दिवसाला प्रवास करणारे साडेचार हजार प्रवाशांचा प्रवास थांबला आहे.
९० कोटी रुपयांचा फटका
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पुण्यासाठी लक्झरी बस निघत.े त्यांचे मुख्य केंद्र जळगाव असते. येथून प्रवाशी वाहतुकीसह लगेज वाहतूकही केली जाते. २० मार्चपासून जिल्ह्यातील एक ही लक्झरीने प्रवाशी वाहतूक केली नाही. दररोज निघणाऱ्या १५० गाड्यांचे महिन्याचे अर्थकारण २० ते २२ कोटी रुपये आहे. इतका पैसा या व्यवसायात खेळता असतो. चार महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने जवळपास ९० कोटींचा फटका या व्यवसायाला बसला आहे.
१५०० जण बेरोजगार
एक बस गाडीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या दहाच्या घरात आहे. यात मालकापासून चालक, कंडक्टर, हमाल, तिकीट बुकिंग एजंट आणि मॅकेनिक अशा स्वरूपात १५० लक्झरी बसमागे १५०० जणांच्या उदरनिवार्हाचे साधन गेल्या चार महिन्यांपासून ठप्प आहे. काही मालकांनी उत्पन्न नसले तरी चालकांना घर चालविण्यासाठी मदत सुरू ठेवली, तर चार महिन्यांपासून काम नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले कर्मचारी मिळेल ते काम करून उपजीविका भागवत आहे.
चाक खिळले मालकाचे पाय रुतले
बसगाड्या बंद असल्याने कोणतेही उत्पन्न नाही. असा एकही बसमालक नाही की त्याची बस फायनान्स नाही. फायनान्सचा मासिक हप्ता ५० हजारांहून एक ते सव्वा लाखांपर्यंत आहे. तूर्त हप्ते भरण्यात दिलासा असला तरी व्याज काही सुटलेले नाही. येत्या काळात थकीत व्याजासह हप्त्यांचा भार वाढणार आहे. चार महिन्यांपासून गाड्या जागेवरच खिळल्या असल्याने आज रोडवर आणण्यासाठी बॅटरी, टायर मेंटेनन्ससाठी एका गाडी मागे ६० हजार रुपये लागतील. अशात कर्ज करून घेतलेल्या बसगाड्यांमुळे मालकांचे पाय रुतले आहे.
शासनाचेही नुकसान
बसच्या एका प्रवाशी सीटमागे ६५०० रुपये प्रति महिना टॅक्स आहे. एका बसचा चार महिन्याचा टॅक्स भरणा हा ५५ ते ६० हजारांच्या घरात आहे. यामुळे चार महिने बसगाड्या बंद राहिल्याने ९० लाख कर बुडणार आहे. बंदचा काळ वाढल्यास कराचे नुकसान वाढेल

शासनाने कोरोना संकटात समाजातील सर्व घटकांना मदत केली आहे. यात खासगी ट्रॅव्हल्स मात्र सुटले आहे. गाड्या सुरू झाल्यावर पहिल्याप्रमाणे व्यवसाय मिळण्यास अवधी लागेल. शासनाने कर्ज करून घेतलेल्या बसमालकांना व्याजात सूट द्यावी ही अपेक्षा आहे.
-प्रमोद झांबरे, ट्रॅव्हल्स मालक

बसमालकांना किमान आठ महिन्यांची टॅक्स माफी मिळावी. वर्षभराचे टोल फ्री व्हावेत, बस जेवढ्या वेळ उभ्या आहेत तेवढा कालावधी इन्शुरन्समध्ये वाढ करून मिळावा. यासह अन्य मागण्या आम्ही मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे केल्या आहेत. आज प्रत्येक बस मालक तोट्यात आहे. तर या व्यवसायावर अवलंबून असलेले कर्मचारी बेरोजगार आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा.
-मुकेश बेदमुथा, अध्यक्ष, जळगाव बस ओनर्स असोसिएशन, जळगाव

Web Title: Luxury closed for four months, over one and a half thousand people unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.