व्यवसायात नुकसान, महाराष्ट्रातील तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेला अन्...; धक्कादायक घटना समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:42 IST2024-12-05T09:39:42+5:302024-12-05T09:42:56+5:30
नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाइल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडली होती.

व्यवसायात नुकसान, महाराष्ट्रातील तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेला अन्...; धक्कादायक घटना समोर
जळगाव: भागीदारी व्यवसायात नुकसान झाल्यामुळे एक तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणामुळे तपास लागून सदर तरुणाला पुन्हा घरी आणण्यात यश आलं आहे. त्याची दुचाकी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक आढळल्याने सर्वांची चिंता वाढली होती. मात्र, हा तरुण घरी सुखरूप परतल्याने कुटुंबाला मोठा धीर मिळाला.
नीरज प्रभाकर चव्हाण (रा. चहार्डी, ता. चोपडा, ह.मु. भुसावळ) या तरुणाने तीन सहकाऱ्यांसोबत भागीदारीमध्ये भुसावळ, जळगाव, चोपडा, धरणगाव याठिकाणी मेडिकल टाकले होते. भुसावळातील मेडिकल नीरज चालवीत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्याचे इतर भागीदार त्या मेडिकलमधील भागीदारी काढण्याचा निर्णय घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाइल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडली होती. त्याच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व त्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली होती.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोउनि शरद बागल, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी यांना शोध घेण्याविषयी सूचना दिल्या. या पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणात नीरज इंदूर येथे असल्याची माहिती मिळाली व नातेवाइकांना सोबत घेत इंदूर गाठले. तेथील एका हॉटेलमध्ये असलेल्या नीरजला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेत जळगावात आणले.