बोदवड (जि. जळगाव) इनामी शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक व कागदपत्रांत खाडाखोड केल्याच्या आरोपावरून आमदार एकनाथ खडसे, त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्यासह अन्य लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अॅट्रॉसिटीचाही त्यात समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खडसे यांचे प्रतिनिधी सुधाकर पाटील, बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
चमेलीबाई तुकाराम तायडे (८२) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांच्या नावावर २००२ मध्ये 'सरकारी वर्ग-दोन'ची शेतजमीन होती. त्यावेळी आमदार खडसे यांनी गावात येऊन जमिनीवर तापी-पूर्णा साखर कारखाना उभारण्याचे तसेच रोजगाराची संधी व योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले. जमीन व्यवहारादरम्यान ५१ हजार रुपये इसार म्हणून देण्यात आले होते. जानेवारी २००२ मध्ये हा व्यवहार सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मानपूर येथे जमिनीचा साखर कारखान्याच्या नावाने व्यवहार झालेला नाही. बदनामी करण्यासाठी रचलेला हा डाव आहे. सन २००२ मधील या जमिनीचा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला आहे. एकनाथ खडसे, आमदार.