लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे रविवार १२ रोजी आगमन होणार आहे. १३ रोजी सोमवारी महालक्ष्मी गौरींचे पूजन व महानैवेद्य अर्पण करण्यात येईल व १४ रोजी मंगळवार गौरी विसर्जन होईल. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते. पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते. परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. काही कुटुंबांमध्ये धान्यावर बसलेल्या तर काहींकडे उभ्या महालक्ष्मीला दागिने तसेच मुखवटे घालून सजावट करण्यात येत असते. त्यांना विविध शृंगार करीत सजविली जाते.
ईन्फो
यंदा रविवारी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे सकाळी ९.५० मिनिटांनंतर गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठा नक्षत्र सोमवारी ८.२३ मिनिटांनंतर असल्याने पूजन करावे. त्यादिवशी नेहमीप्रमाणे गौरी पूजन व महानैवेद्य अर्पण करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १४ रोजी सकाळी ७.०५ मिनिटानंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठरावीक वेळेची मर्यादा नसते, मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल. यंदा मंगळवार असला तरीही विसर्जन परंपरेप्रमाणे करता येईल, तसे मोहन दाते यांनी सांगितले.
गौर आली गौरी
गौरी आवाहनासाठी अंगणात सडासंमार्जन करून रांगोळीने गौरींचे हळदी कुंकवाचे पावले काढली जातात. त्यावर लक्ष्मीचे विविध प्रकारचा उल्लेख करण्यात येत असतो. त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. गौर आली गौरी कशाच्या पावलांनी आली, गाई वासरांच्या पावलांनी आली ही आठ पावले असून त्यात आपल्या गरजेनुसार वैभव, अलंकार, सुखसमृद्धी, आदी शब्दांचा उल्लेख करण्यात येत असतो.
ज्येष्ठा लक्ष्मीचे पूजन महानैवेद्य
कुटुंबात लक्ष्मीचा वास राहून सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य सुख-समृद्धी घरात नांदावी यासाठी गौरीपूजन, अर्चन, करण्यात येते. ज्येष्ठा नक्षत्रावर केवडा, पडवळ, कमळाचे फूल सोळा प्रकारची पत्री, विविध पुष्पांनी लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. पुरणपोळी लाडू, करंजी, सोळा प्रकारचे भाज्या अनारसे, सांजोरी यासह अन्य पंचपक्वान्नांचा महानैवेद्य देवीला अर्पण करण्यात येत असतो. ज्वारीचे पीठ, ताकापासून तयार करण्यात आलेले अंबिलाचा महानैवेद्याला महत्त्व आहे.