बालिकेच्या विनयभंगानंतर जामनेरला तणाव, पोलीस वाहनांवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 22:33 IST2021-12-31T22:33:31+5:302021-12-31T22:33:45+5:30
जमावाची पोलीस वाहनावर दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

बालिकेच्या विनयभंगानंतर जामनेरला तणाव, पोलीस वाहनांवर दगडफेक
जामनेर : बालिकेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी जामनेरात घडली. या आरोपीला पकडून जमावाने मारहाण केली. आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या संतप्त जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील घरकुल परिसरात घडली. या घटनेनंतर या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीस ठाण्यातदेखील गर्दी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हफीज बेग मेहमुद बेग (५२, रा.घरकुल परिसर, जामनेर) याने पिडीतेस त्याचे घरात पलंगाखाली लपवून ठेवत विनयभंग केला. मुलीच्या आईने याचा जाब विचारला असता तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या, अशी धमकी आरोपीने दिली.
घटनेची माहिती घरकुलातील नागरिकांना समजताच त्यांनी संशयितास घराबाहेर काढले आणि मारहाण केली. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहाचले. संशयितास त्यांनी बाहेर काढले व वाहनात बसविले. संशयिताला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावातील लोक करीत होते. अशातच काही जणांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने काचा फुटल्या. जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीमार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. संशयित हफीज बेग याच्याविरुध्द पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट तपास करीत आहे.