गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमी मेहरूण तलावाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:20+5:302021-09-12T04:21:20+5:30
तराफा बनविण्यास व रस्त्यांच्या दुरूस्तीला सुरूवात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात ...

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमी मेहरूण तलावाची पाहणी
तराफा बनविण्यास व रस्त्यांच्या दुरूस्तीला सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले. मात्र, आता गणेश विसर्जनाला अवघे आठ दिवस बाकी असताना मनपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. शनिवारी आयुक्तांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी विसर्जन स्थळ असलेले मेहरूण तलावावर पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे मेहरूण तलावाची पाण्याची पातळी ही खालावली होती. मात्र, आठवडाभरात दोन ते तीन वेळा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मेहरुण तलावाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे विसर्जनाची चिंता मिटली आहे. गणेश घाट व सेंट टेरेसा शाळेच्या बाजूने असलेल्या भागाकडे गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. त्या दृष्टीने मनपाकडून तयारी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ प्रवीण मुंढे, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शहर अभियंता अरविंद भोसले, बाळासाहेब चव्हाण व अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी यांनी शनिवारी मेहरूण तलाव वरील गणेश घाट व सेंट टेरेसा शाळेजवळील विसर्जन घाटाची पाहणी केली.
बोटीची घेतली चाचणी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागाचे वीस जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून अधिकाऱ्यांनी नियोजन संदर्भात आढावा घेतला. त्यानंतर तलावात तैनात केलेली बोटीची चाचणी घेण्यात आली.
तराफे बनविण्यास सुरूवात
लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेकडून पाच ते सहा तराफे तयार केले जाणार आहे. आतापर्यंत दोन तराफे तयार करण्यात आले असून शनिवारी त्यांची सुद्धा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच मेहरूण तलावावर बॅरिकेट्स सुद्धा लावण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
रस्त्यांची दुरूस्ती
मनपा प्रशासनाने आता रस्ता दुरूस्तीचे कामही हाती घेतले आहे. मेहरूण परिसरातील रस्त्यांची शनिवारी दुरूस्ती करण्यात येत होती़ यावेळी मुरूम टाकून खड्डे बुजविले जाते होते. विसर्जन मार्गाची दुरूस्ती केली जाणार आहे. तसेच मेहरूण परिसरात विद्युत दिवे बसविण्याचे काम करण्यात येत आहे.