Information speculation; Found sour buff | माहिती मिळाली सट्टयाची; आढळले आंबट शौकीन

माहिती मिळाली सट्टयाची; आढळले आंबट शौकीन

जळगाव : भजे गल्लीतील साई गजानन पॅलेस येथे सट्टा घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी येथे धाड टाकली, मात्र तेथे सट्ट्याऐवजी आंबट शौकीनच आढळून आले. दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर ग्राहक असलेला तरुण फरार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान, लॉज मालकही पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झाली. उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसात नोंद नव्हती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भजे गल्लीतील हॉटेल साई गजानन पॅलेस व लॉजिंग येथे गणेश महाजन नावाची व्यक्ती सट्टा घेत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार चिंथा यांनी खात्रीसाठी साध्या गणवेशात एक कर्मचारी पाठविला असता या कर्मचाऱ्याने गणेश महाजन यालाच गणेश महाजन कोण आहे अशी विचारणा केली. त्याने तो या गल्लीत गेला असे सांगून त्या कर्मचाऱ्याला तिकडे रवाना केले अन‌् इकडे हा व्यक्ती फरार झाला. परिसरात कोणीच दिसत नसल्याने या कर्मचाऱ्याने तळमजल्यात जावून पाहणी केली असता तेथे आंबटशौकीनाचे चाळे सुरु होते. त्याने लागलीच ही माहिती चिंथा यांना कळविली. चिंथा व सहकाऱ्यांनी धाव घेताच तरुण फरार झाला तर दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावर जिल्हा पेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. चिंथा यांनी लॉज मालक कोण आहे अशी चौकशी केली मात्र त्यांना कोणीच माहिती दिली नाही. त्यामुळे चिंथा यांनी लॉजमधील सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात दोन तरुणी जाताना दिसत होत्या.दरम्यान, गणेश महाजन याने पोलीस कर्मचाऱ्यालाही मामा बनविले. याप्रकरणाची उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.

Web Title: Information speculation; Found sour buff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.