राखीव जागांसाठी आणखी किती प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 08:25 PM2020-09-23T20:25:33+5:302020-09-23T20:25:54+5:30

आरटीई प्रवेश : प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांचा सवाल ; मुदतीपर्यंत २४५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

How much longer to wait for reserved seats | राखीव जागांसाठी आणखी किती प्रतीक्षा

राखीव जागांसाठी आणखी किती प्रतीक्षा

Next

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सुरुवातीपासून अल्प प्रतिसाद मिळत होता. पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या ३३४१ विद्यार्थ्यांपैकी फक्त २४५४ विद्यार्थ्यांनीच शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश घेतला. दुसरीकडे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही जाहीर झालेली नाही, शाळांमध्‍ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालेले असल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यामुळे २५ टक्के राखीव जागांसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्‍यात येत आहे.

आरटीई २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी १७ मार्चला पहिली सोडत काढण्‍यात आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील २८७ शाळांमधील ३५९४ जागांसाठी सुमारे ३३४१ विद्यार्थ्यांची निवड करण्‍यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाला. परिणामी, या प्रवेश प्रक्रिया काही महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्‍यात आली आहे. सुरूवातील पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्‍यात आली होती. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली होती. आता ही मुदत संपली असून अद्याप प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सूचना न आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची कधी संपणार 'प्रतीक्षा'
जिल्ह्यातील सुमारे २ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित केले आहे. आता ११४० रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशासाठी सध्‍या शाळेत जावू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर देण्‍यात येईल, अशी माहिती गेल्या सहा महिन्यांपासून देण्‍यात येत आहे. त्यातच शाळांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झालेले आहे. पाल्यांचे प्रवेश झालेले नसल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्‍यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

१८० अर्ज रिजेक्ट
शाळांमध्ये प्रवेश निश्चित केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून मुळ कागदपत्रांची तपासणी करण्‍यात येत आहे. कागदपत्रांच्या अभावासह काही त्रुटींमुळे १८० विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्‍यात आलेले आहे.

Web Title: How much longer to wait for reserved seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.