जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:26 IST2019-03-14T18:25:46+5:302019-03-14T18:26:12+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी
जळगाव - राष्ट्रवादी कॉँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले. यापूर्वी शरद पवार यांनीही त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्या होत्या. जिल्हा मजूर फेडरेशनपासून देवकर यांची कारकिर्द सुरू झाली त्यानंर राज्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
गुलाबराव देवकर हे जिल्हा मजूर फेडरेशनचे अनेक वर्षे सभापती होते. जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्षही ते काही वर्षे होते. तत्कालीन पालिकेत त्यांनी बांधकाम समिती सभापती म्हणून राजकीय प्रवासाला सुरूवात केली. यानंतर नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. जळगाव महापालिकेचे ते २००३- २००४ या काळात स्थायी समिती सभापती होते.
सन २००३ ते २००६ या काळात या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यपदही मिळाले होते. जळगाव शहर मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने गठीत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाची २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रसने उमेदवारी दिली आणि त्यात ते विजयी झाले. २०१३ मध्ये राज्य मंत्रिमंडळात कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, रोजगार, स्वयंरोजगार विभागाचे राज्यमंत्री होते. पक्षाने त्यांना आता जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे.