गिरीश महाजन गोवा, पश्चिम बंगालमधील प्रचारात; इकडे शिवसेनेनं केली भाजपावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:25 AM2022-02-14T10:25:10+5:302022-02-14T10:28:10+5:30

भाजपला अडीच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा तर काही बदलता आला नाही, मात्र भाजपचाच चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. भाजपला पुन्हा मनपातील बहुमत गमवावे लागले आहे.

Girish Mahajan busy in Goa, west Bengal campaign; Shiv Sena divided BJP | गिरीश महाजन गोवा, पश्चिम बंगालमधील प्रचारात; इकडे शिवसेनेनं केली भाजपावर मात

गिरीश महाजन गोवा, पश्चिम बंगालमधील प्रचारात; इकडे शिवसेनेनं केली भाजपावर मात

Next

>> अजय पाटील

जळगाव : चार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ‘आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवू’ अशी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या हाकेला जळगावकरांनी साथ देत, महापालिकेत भाजपच्या तब्बल ५७ जागा जिंकवून, स्पष्ट बहुमत दिले. मात्र, भाजपला अडीच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा तर काही बदलता आला नाही, मात्र भाजपचाच चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले माजी मंत्री गिरीश इतर राज्यांमधील प्रचारात व्यस्त असताना, शिवसेनेने दुसरीकडे भाजपवर मात केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील भाजपच्या संघटनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचाच आरोप आता भाजपमधील नगरसेवक करू लागले आहेत. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजपला सातत्याने गळती लागली असून, महापालिकेतील सत्ता गमाविल्यानंतर आता ऑक्टोबर २०२१ मध्ये काही नगरसेवकांची घरवापसी करून, मनपात बहुमत मिळवले होते. मात्र, आता भाजपला पुन्हा मनपातील बहुमत गमवावे लागले आहे.

महाजनांचे दुर्लक्ष, भोळे जिल्ह्यात व्यस्त

१. महापालिकेतील भाजपवर माजी मंत्री गिरीश महाजन यांचा एकहाती दबदबा होता. मात्र, २०१९ मध्ये राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर गिरीश महाजनांचे जळगाव महापालिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. त्यात राज्य शासनाकडील १०० कोटींच्या निधीवर शासनाने स्थगिती आणल्यानंतर राज्य शासनानेही महापालिकेत भाजपची कोंडी केली.

२. गिरीश महाजनांचे दुर्लक्ष होत असतानाच, शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्षपद आल्यामुळे सुरेश भोळे हे देखील जिल्ह्यात व्यस्त झाल्यामुळे शहराकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांवर जो बड्या नेत्याचा अंकुश असायला पाहिजे तो त्यांच्यावर राहिला नाही. त्यात नगरसेवकांच्या प्रभागातील कामेदेखील होत नसल्याने, नगरसेवकांची नाराजी वाढत जात आहे.

५८ कोटींचा निधी आणि नगरसेवकांच्या कोलांटउड्या

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. तसेच गेल्या चार वर्षात अनेक प्रभागांमधील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. एकीकडे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामांसाठी भरघोस निधी मिळत असताना, दुसरीकडे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात मात्र समस्या कायम आहेत. त्यात आता ५८ कोटींच्या निधीतून शहरातील विकासकामांचे प्रस्ताव मागविले जात असताना, त्यामध्ये काही कामे आपल्या प्रभागात व्हावी व निधी मिळावा यासाठी आता नगरसेवकांची धडपड सुरु आहे. त्यासाठी नगरसेवकांच्या एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या सुरु आहेत.

गेल्या साडे तीन वर्षातील मनपातील पक्षीय बलाबल

ऑगस्ट २०१८

भाजप - ५७

शिवसेना -१५

एमआयएम - ३

मार्च २०२१

भाजप - ३०

भाजप बंडखोर - २७

शिवसेना - १५

एमआयएम - ३

मे २०२१

भाजप - २७

भाजप बंडखोर - ३०

शिवसेना - १५

एमआयएम -३

ऑक्टोबर २०२१

भाजप - ४०

बंडखोर - १७

शिवसेना - १५

एमआयएम - ३

फेब्रुवारी -२०२२

भाजप - ३०

शिवसेना - १५

बंडखोर - २७

एमआयएम - ३

Web Title: Girish Mahajan busy in Goa, west Bengal campaign; Shiv Sena divided BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.