जळगाव : कृषी कॉलनीत १९९८ साली प्राणप्रतिष्ठा झालेल्या नवसाचा गणपती मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रसन्न व चैतन्यमय वातावरणात हे मंदिर असून नवसाला पावणारा, मनातील इच्छा, आकांशा पूर्ण करणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध असल्याचे ट्रस्टचे उपाध्यक्ष व्ही. झेड. पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी या मंदिराबाबत माहिती दिली. दत्तात्रय गंधे हे पिंप्राळा येथील गणपती मंदिरात पुजारी होते. त्यांचा स्वर्गवास झाल्यानंतर मंदिर उद्ध्वस्त झाले. त्या ठिकाणची गणेशाची मूर्ती ही त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवण्यात आली. त्यानंतर जिर्णोध्दार करून एक छोट्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर १९९८ साली कृषी कॉलनीतील नवसाचा गणपती म्हणून ट्रस्टची नोंदणी करून कॉलनीच्य खुल्या भुखंडात सात जणांनी पुढाकार घेत गणपती मंदिर उभारले व या ठिकाणी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गणेश जयंतीला करण्यात आली. तेव्हापासून रोज या ठिकाणी विविध कार्यक्रम होतात. चतुर्थीला बालकांची गर्दी असते. तर गणेश जयंतीला भजन, कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. व्यवस्थापकीय मंडळात अध्यक्ष तुकाराम पाटील, सचिव अरूण पाटील, उपाध्यक्ष व्ही. झेड. पाटील, खजिनदार वामन महाजन यांच्यासह सदस्य जनार्दन शिंपी, दिलीप पाटील, सुभाष महाजन यांचा समावेश आहे. यांच्या पुढाकाराने हे मंदिर उभे राहिले आहे.