चिमुकलीच्या भविष्यासाठी मैत्रीच्या ‘धाग्या’चा आधार, जळगावात मयताच्या कुटुंबासाठी सरसावले मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:54 PM2018-01-14T12:54:55+5:302018-01-14T12:59:06+5:30

पतंगाची विक्री करून देणार आर्थिक मदत

Friend's help for the future of child | चिमुकलीच्या भविष्यासाठी मैत्रीच्या ‘धाग्या’चा आधार, जळगावात मयताच्या कुटुंबासाठी सरसावले मित्र

चिमुकलीच्या भविष्यासाठी मैत्रीच्या ‘धाग्या’चा आधार, जळगावात मयताच्या कुटुंबासाठी सरसावले मित्र

googlenewsNext
ठळक मुद्देपतंग विक्रीसाठी लावले बॅनरपतंग विक्री होऊन मिळणारी रक्कम सपकाळे कुटुंबाला

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 -   हसत-खेळत आनंदाने संसार सुरू असताना अचानक आजाराने डोके वर काढत घराचा आधार असलेल्या महेश सपकाळे (वय 30, रा. कोल्हे वाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर संकट तर ओढावलेच, सोबतच केवळ एक महिन्यांच्या चिमुकलीचे पितृछत्रही हरपले. अशा वेळी महेशच्या मित्रांनी पुढाकार घेत या कुटुंबाच्या मदतीसाठी संक्रातीच्या पाश्र्वभूमीवर पतंगाचे दुकान लावून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
मैत्री, माणुसकी सध्या हरवत चालली आहे, अशी सातत्याने सर्वत्र  ओरड होताना दिसते. मात्र जळगावातील जोशी पेठ भागामधील हर हर महादेव मित्र मंडळाचे कार्य पाहिले तर अजूनही मैत्रीची जाण ठेवत माणुसकी जपली जात असल्याचा सुखद अनुभव येईल. या मंडळाने धार्मिक कार्यासह आता समाजाचे काही देणे लागतो, या विचाराने संकटात सापडलेल्या मित्राच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
घराचा आधार हरपला
कोल्हे वाडा भागातील रहिवासी असलेले महेश ज्ञानेश्वर सपकाळे हे रिक्षा चालवून तर कधी कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असत. घरात वृद्ध आई-वडील, पत्नी तसेच केवळ एक महिन्याची मुलगी असे सदस्य असून महेश सपकाळे हेच कुटुंबाचा आधार. मेहतीने सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक महेश यांना आजार उद्भवला व त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. मात्र दैवाने घात करीत सपकाळे कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. कुटुंबाचा आधार तर गेलाच शिवाय केवळ एक महिने वय असलेल्या चिमुकलेचे पितृछत्रही हरपले. यामुळे या कुटुंबावर आभाळ कोसळले असून काय करावे, अशा विवंचनेत वृद्ध आई-वडील व पत्नी सापडले आहेत. 
मित्र परिवार सरसावला
महेश सपकाळे हे स्वराज्य निर्माण सेनेचे संस्थापक होते व त्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात पुढाकार घेत होते. त्यामुळे त्यांची ही भावना आपणही जपली पाहिजे, यासाठी या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत तर करू शकत नाही, मात्र प्रासंगिक सण-वार ओळखून त्यात व्यवसाय करणे व त्यातून मिळणारा नफा सपकाळे कुटुंबाला देण्याचा निर्णय महेशचे मित्र तसेच जोशी पेठेतील हर हर महादेव मित्र मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी घेतला. 

...अन् थाटले पतंगाचे दुकान
संक्रातीचा सण तोंडावर आल्याने या काळात पतंगांना मोठी मागणी वाढते. हे ओळखून मंडळाच्या पदाधिका:यांनी पतंगाचे दुकान लावून आपापले काम, नोकरी संभाळत ते या दुकानावर बसत आहेत. विशेष म्हणजे या मंडळींनी स्वत: 10 हजार रुपयांची पतंग खरेदी केली असून त्यातून जो काही नफा होईल तो सर्व सपकाळे कुटुंबास व एक महिन्याच्या चिमुकलीच्या भविष्यासाठी देणार आहे. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष दीपक सोनार, गणेश शेटे, कल्पेश शेटे, सागर कापुरे, विनय सोनार, आकाश बारी, रितेश कुंटे, श्रेयस कुंटे, राकेश कुंटे, केतन चौधरी या मित्रांनी जणू महेशच्या मैत्रीचा धागा पतंगाला बांधून चिमुकलीच्या भविष्यासाठी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पतंग विक्रीसाठी लावले बॅनर
जास्तीत जास्त पतंग विक्री होऊन त्यातून मिळणारी रक्कम सपकाळे कुटुंबाला द्यायची असल्याने या पतंग विक्रीसाठी मंडळाच्या सदस्यांनी याबाबत बॅनरही लावले असून त्यास शहरवासीयांचा प्रतिसाद मिळत आहे. 

यापुढेही विचार करू
गेल्या वर्षीही मंडळाने पतंगाचे दुकान लावून त्यात मिळालेल्या नफ्यातून दुर्गात्सवात आर्थिक मदत केली होती. यंदा पतंग विक्रीस कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून पुढील वर्षीही असाच उपक्रम राबवित चिमुकलीला मदत करण्याचा विचार करू, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. 

Web Title: Friend's help for the future of child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.