चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:26 IST2025-10-21T14:25:19+5:302025-10-21T14:26:06+5:30
Rajiv Deshmukh passes away: २००९ ते २०१४ या काळात राजीव देशमुख हे राष्ट्रवादीचे चाळीसगावचे आमदार होते

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
Rajiv Deshmukh passes away | प्रशांत भदाणे, जळगाव: जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजीव देशमुख यांचे आज (२१ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. राजीव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सक्रिय होते. २००९ ते २०१४ या काळात ते राष्ट्रवादीचे चाळीसगावचे आमदार होते. त्यांनी भाजपचे साहेबराव घोडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यावेळी भाजपचे उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. मात्र यावेळी भाजपचे मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला.
राजीव देशमुख यांचे वडील अनिल देशमुख हे चाळीसगाव नगरपरिषदेचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिले होते. तर त्यांचे काका प्रदीप देशमुख हे जळगाव जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. स्वतः राजीव देशमुख देखील जिल्हा बँकेचे माजी संचालक होते. चाळीसगाव विधानसभा तसेच शहराच्या राजकारणात देशमुख परिवाराचा मोठा वाटा राहिला आहे.