सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा ; तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी ३३४ आयटी-समन्वयक नेमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 16:53 IST2020-10-10T16:49:47+5:302020-10-10T16:53:43+5:30
परीक्षांसाठी ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी : ऑफलाईनसाठी खान्देशात १७९ परीक्षा केंद्र

सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा ; तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी ३३४ आयटी-समन्वयक नेमले
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सोमवार, १२ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षांसाठी ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.
१२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत या परीक्षा होत आहेत. ऑनलाईन परीक्षेसाठी ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला असून यामध्ये धुळे जिल्ह्यातील ११ हजार ५१३, जळगाव जिल्ह्यातील २१ हजार ९३४ व नंदूरबार जिल्ह्यातील ५ हजार ६४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी १४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला असून या मध्ये धुळे जिल्ह्यातील ३ हजार ९८६, जळगाव जिल्ह्यातील ७ हजार २९८ व नंदूरबार जिल्ह्यातील ३ हजार १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यात ५३, जळगाव जिल्ह्यात ९४ व नंदूरबार जिल्ह्यात ३२ असे एकूण १७९ परीक्षा केंद्र राहणार आहेत.
४० प्रश्न सोडवावे लागणार...
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे परीक्षेचे स्वरूप असून पदवीस्तरावरील ६० गुणांच्या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी व ६० प्रश्न असतील यातील कमीत कमी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. पदव्युत्तरस्तरावर ६० गुणांच्या परीक्षेसाठी २ तासांचा कालावधी व ६० प्रश्न असतील यातील कमीत कमी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. बहिस्थ: अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या १०० गुणांच्या परीक्षेसाठी २ तास कालावधी व ५० प्रश्न असतील यातील ४० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
३३४ आयटी-समन्वयक नेमले
ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना डेस्कटॉप, लॅपटॉप विथ व्हेब कॅमेरा, स्मार्टफोनचा वापर करता येईल. या परीक्षांसाठी सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी ३३४ आयटी-समन्वयक नेमण्यात आलेले आहे. विद्यापीठाच्यावतीने सरावासाठी मॉकटेस्ट घेण्यात आल्या, शनिवारी दुपारपर्यंत ३४ हजार २८० विद्यार्थ्यांनी मॉकटेस्ट दिल्या. शिवाय विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नसंच देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व प्रवेशपत्र (हॉलतिकिट) वरील विषयांप्रमाणे परीक्षा द्यावी, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.
परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन
महाविद्यालयनिहाय नेमण्यात आलेल्या आय.टी. समन्वयकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठात प्रा. के.एफ. पवार यांच्या समन्वयांखाली परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे तांत्रिक अडचणींचे निराकरण सॉफ्टवेअर मधे Chatbot च्या सहाय्याने होवून परीक्षार्थींचे प्रश्न त्वरीत सुटण्यास मदत होणार आहे. तांत्रिक व्यत्यय दूर न झाल्यास संबधित महाविद्यालयाच्या आय.टी. समन्वयकाशी संपर्क साधावा. त्यानंतरही विद्यार्थ्यांना अडचण आल्यास sfc@digitaluniversity.ac किंवा desell@nmu.ac.in यावर ईमेल करावा.
प्राचार्यांची झाली बैठक
ऑफलाईन होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रावर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर राखून महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व आरोग्य मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबतीत सर्व महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नुकतीच घेण्यात आली त्यामध्ये सर्व सदस्यांना परीक्षेच्या पूर्व तयारीची माहिती देण्यात आली. सर्व प्राचार्यांची तसेच महाविद्यालयांमध्ये नेमण्यात आलेल्या आयटी-समन्वयकांची देखील बैठक घेण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या प्राचार्यांच्या ऑनलाईन झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते त्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षांचे आयोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
स्वतंत्र संधी मिळणार...
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही. पवार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी तसेच अधिकारी, कर्मचारी हे परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार काही कारणास्तव विद्यार्थी परीक्षा देऊ न शकल्यास एक संधी म्हणून स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.