जळगाव : जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ९४ टक्के शेतकर्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. परिणामी राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी दिवाळीपुर्वी विशेष आर्थिक मदत जाहीर केली होती.
ही मदत थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी १८ कोटी ८० लाख १० हजार रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली होती. जिल्हा प्रशासनाकडे ही मदत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ बीडीएसद्वारे तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली. तहसीलदारांनाही ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार जिल्ह्यातील ४१ हजार ८९८ शेतकर्यांच्या खात्यावर १७ कोटी ६० लाख ९० हजार १९५ रूपये वर्ग करण्यात आले. जिल्ह्यातील एकुण ९४ टक्के शेतकर्यांना रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
तालुुकानिहाय वितरित रक्कमेची टक्केवारी
भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यातील शेतकर्यांना १०० टक्के नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. तर जळगाव तालुक्यात ९२.६३, जामनेर ९९.९३ एरंडोल ८६.८५, धरणगाव ९०.२८, पारोळा ९८.३३, यावल ९५.८८, रावेर ८९.८३, अमळनेर ९६.२६, पाचोरा ८६.८७, भडगाव ९९.९८ आणि चाळीसगाव तालुक्यात ९७.४० टक्के भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. एकूण १७ कोटी ६० लाख ९० हजार १९५ रूपये वर्ग करण्यात आले आहे.
-मदतीसाठी वर्ग केलेली रक्कम
१७ कोटी
-प्रशासनाला प्राप्त झालेला निधी
१८ कोटी
-जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी
४१,८९८