जळगावात कारचा कट लागल्याने तरुणाला चॉपरने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:02 IST2018-08-12T13:00:55+5:302018-08-12T13:02:11+5:30
खोटे नगरजवळील घटना

जळगावात कारचा कट लागल्याने तरुणाला चॉपरने भोसकले
जळगाव : कारचा रिक्षाला कट लागल्याच्या कारणावरुन प्रशांत राजेंद्र पाटील (वय २८, रा.कंडारी, ता.जळगाव) या तरुणाला रिक्षा चालकाने चॉपरने भोसकल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजता महामार्गावर खोटे नगर परिसरात घडली. जखमी प्रशांत याच्यावर पाच ठिकाणी वार झाले असून त्याच्यावर खासगी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. शंभराच्यावर टाके घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हल्लेखोर पसार
प्रशांत याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून रिक्षा चालक व त्याच्या सहकाऱ्याने पळ काढला. मित्र अनिल याने प्रशांत याला खासगी दवाखान्यात आणले. त्यानंतर अनिल हा तेथून निघून गेला. प्रशांत याच्यावर शंभराच्यावर टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेत एका जणाने रिक्षाचा क्रमांक लिहिला असून त्याआधारावर हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, मात्र हल्लेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासगी रुग्णालयात प्रशांत याचे मित्र व नातेवाईक यांची प्रचंड गर्दी झाली होती.
अशी घडली महामार्गावर रात्री ९ वाजता घटना
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा येथे मित्राच्या आईचे निधन झाल्याने प्रशांत पाटील, अनिल चौधरी व मुकेश नन्नवरे (रा.समता नगर, जळगाव) असे तिन्ही जण अनिल याच्या मेहुण्याची कार घेऊन चोपडा येथे गेले होते. तेथून धरणगाव, पाळधीमार्गे परत येत असताना खोटे नगर परिसरात शहराकडून बांभोरीकडे जाणारी रिक्षा व कार यांच्यात कट लागला. नेमका कोणत्या वाहनाचा कोणाला कट लागला हे समजू शकले नाही, मात्र या घटनेनंतर रिक्षा चालकाने मागे वळून कारचा पाठलाग केला. दादावाडीच्या मागे या कारच्या पुढे रिक्षा आडवी लावली.
कंडारीच्या तरुणावर ५ वार
कार चालक अनिल व रिक्षा चालक यांच्यात वाद झाला. यात कारचाही साईड ग्लास तुटल्याचे अनिल सांगत असताना चालकाच्या शेजारी बसलेला प्रशांत खाली उतरुन वाद मिटवायला आला असता रिक्षातील एका जणाने कमरेला लावलेला चॉपर काढून कंडारी येथील प्रशांत याच्या पोटावर व छातीवर सपासप पाच वार केले.े