दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:32 IST2025-06-02T12:26:58+5:302025-06-02T12:32:15+5:30

धुळ्यात लष्करातील कर्मचाऱ्याने पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dhule Sharda Bagul father had given Kapil Bagul two lakh rupees but the harassment continued | दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर

दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर

Sharda Bagul Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच धुळ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यातील वलवाडी गावात सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने पत्नीची पेस्टीसाईडचे इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी संशयित आरोपी पती कपिलसोबत आई, बहीण आणि प्रेयसी या चार जणांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. कपिल बागुल याने जबरदस्तीने इंजेक्शन देऊन शारदाची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

शारदा कपिल बागुल या पीडितेने वर्षभरापूर्वी जळगावात महिला दक्षता समितीकडे कपिलविरोधात तक्रार केली होती. वारंवार छळ होत असल्याचा उल्लेख करण्यासह आपला संसार सुखाचा व्हावा, म्हणून तिने वडिलांकडून सासरच्यांना पैसेही मिळवून दिल्याचे या तक्रारीत म्हटलं होतं. मात्र पतीने गोड बोलून आणि सुखाचा संसार करण्याचे स्वप्न दाखवून शारदाला घरी नेले होते. मात्र त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही आणि शेवटी कपिलने शारदाची हत्या केली.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील माहेर असलेल्या शारदा बागुल हिने तिला सासरी होणाऱ्या सततच्या त्रासाविषयी जळगाव महिला दक्षता समितीकडे ११ जून २०२४ रोजी तक्रार केली होती. आपल्या वडिलांनी लग्नाचा सर्व खर्च करण्यासह दागिने दिले होते, असे शारदाने म्हटलं. माझे वडील निवृत्त झाल्याने त्यांना मोठी रक्कम मिळाल्याने त्यावर सासरच्या मंडळींचे लक्ष होते व त्यांनी बळजरीने दोन लाख रुपये मागायला लावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे तरी आपला संसार सुखाचा होईल, या विचाराने शारदाने वडिलांकडून दोन लाख रुपये मिळवून दिलेसुद्धा होते.

भरपावसात मुलांसह घराबाहेर काढले 

मात्र कपिलला दोन लाख रुपये दिले तरी शारदाला त्रास देणे सुरूच होते. तिने पुन्हा दोन लाख रुपये आणावे म्हणून २०१८ मध्ये रात्री ११ वाजता दोन वर्षाची मुलगी व चार महिन्याच्या मुलासह भरपावसात तिला घराबाहेर काढले होते. दुसरीकडे, कपिल बागुल हा प्रेयसीला तिच्या मुलांसह घरी आणायचा. या सगळ्या प्रकाराला विरोध केल्यानंतर कपिल शारदाला अजून चार विवाह करेल, अशी धमकी देत होता. त्यानंतर शारदाने जळगावात ही तक्रार दिली होती.

यानंतर शारदाने महिला दक्षता समितीकडे तक्रार करण्यासह सैन्य दलातील अधिकाऱ्याकडेही तक्रार केली होती. त्यावेळी मात्र कपिलने माफी मागितली आणि शारदाला घरी आणलं होतं. मात्र त्यानंतरही कपिलने शारदाला त्रास देणे सुरुच ठेवले होते.
 

Web Title: Dhule Sharda Bagul father had given Kapil Bagul two lakh rupees but the harassment continued