जीएमसीत तासभर वाजले ढोल ताशे : शंभरापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विनामास्क मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सायलेंट झोन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात कोविडचे सर्व नियम पायदळी तुडवत दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी दीड तास ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली. अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद हे रजेवर असून त्यांच्या जागी डॉ.किशोर इंगोले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. शिवाय नवीन डिन नियुक्तीचा तिढा कायम असताना महाविद्यालयात मात्र नियम पायदळी तुडवले जात असल्याचे गंभीर चित्र शुक्रवारी सायंकाळी होते.
शुक्रवारी सर्वत्र गणेशोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात काही नियम घालून दिले आहेत. त्यात मिरवणूकांना बंदी घालण्यात आली आहे. अशा ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने गुरूवारीच नवीन आदेश जारी केले आहेत. यात प्रत्यक्ष मंडपात जावून गणपती मूर्तीचे मुखदर्शन न घेता ते ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे, असे हे आदेश आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय केले जात असताना शासकीय यंत्रणेचा एक भाग असलेल्यांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र होते.
२०० मिटरपर्यंत काहीच नको
काही डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर रुग्णालय परिसराच्या २०० मिटरपर्यंतचा परिसर हा सायलेंट झोन असतो. त्या ठिकाणी आवाजाची मर्यादा असते. त्यापेक्षा अधिक आवाज म्हणजे नियमांचे उल्लंघ होते. मात्र, जीएमसती नेत्र कक्षाजवळच तासभर ढोलताशे वाजले.
कोविडच्या नियमांबाबत बेफिकरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी दुपारी साडे तीन वाजेपासून मिरवणुकीला सुरूवात केली. एकाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या तोंडाला यावेळी मास्क नव्हते. अगदी गर्दी करून हे विद्यार्थी जल्लोषात नृत्य करीत होते. तासभर या परिसरात ढोल ताशे अगदी मोठ मोठ्याने वाजत होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी स्पीकरवर गाणे लावून नृत्य केले. फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत:फज्जा उडालेला होता.