जळगाव : हुंड्यातील उर्वरित तीन लाखाच्या रक्कमेसाठी पोलीस पतीसह सासू, नणंद, नंदोईने संगनमत करून विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.
मेहरूण येथील प्रवीण पाटील यांची लहान कन्या कोमल हिचा विवाह १३ फेब्रुवारी २०१६ रोजी रामेश्वर कॉलनीतील चेतन अरविंद ढाकणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला होता. चेतन ढाकणे हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून २० लाख रुपये देण्याचे ठरले होते. परंतू, लग्न थाटामाटात झाल्याने प्रवीण पाटील यांनी ७ लाख रुपये दिले. त्यानंतर उर्वरित १३ लाख रूपयांपैकी १० लाख रुपये चार महिन्यांपूर्वी घर घेण्यासाठी त्यांनी दिले होते. हुंड्यातील ३ लाख रूपये देणे बाकी होते. त्यामुळे उर्वरित ३ लाख रुपये माहेरून आणावे यासाठी कोमल हिला सासरचे मंडळी सतत त्रास देत होते व तिला मारहाण करीत होते. अखेर गुरूवार, ९ सप्टेंबर रोजी कोमलने वडिलांना फोन करून पती तीन लाख रूपये मागत असून त्यासाठी पतीसह सासू, ननंद, नंदोई हे खूप त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर वडिलांनी मुलीच्या घरी जावून भेट घेतली. त्यावेळी ती चिंचेत दिसून आली.
यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
गुरूवारी रात्री प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती चेतन ढाकणे, सासू मंदाबाई ढाकणे, नणंद प्रतिभा घुगे व नंदोई ज्ञानेश्वर घुगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.