जळगाव : बाप्पाच्या आगमनाने बाजारपेठेत उत्साह अन् चैतन्याचे वातावरण असून शुक्रवारी गणेश मूर्ती, विविध साहित्यासोबतच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी व बुकिंगसाठी मोठा प्रतिसाद दिसून आला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ४०० दुचाकी तर जवळपास २०० चारचाकी वाहने विक्री झाली. विशेष म्हणजे यंदा कोरोनामुळे गुढीपाडवा, अक्षयतृतीया या मुहूर्तावर बंधने असल्याने खरेदीवरही परिणाम झाला होता. त्यानंतर आलेल्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेकांची खरेदी करण्यास प्राधान्य दिले. उत्सव पर्वाच्या सुरुवातीलाच वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदीला अधिक पसंती वाढली असल्याचे सुखद चित्र आहे.
४०० दुचाकींची विक्री
गणेश चतुर्थीच्या दिवशी दुचाकी खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती दिसून आली. शहरातील एकाच दालनात १०० दुचाकींची विक्री झाली. या दुचाकींसह इतरही दालनातील मिळून एकूण ४०० दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला. दुचाकींवर विविध योजना असल्याने त्याचाही लाभ ग्राहक घेत आहेत. यामध्ये मनपसंत वाहन मुहूर्तावर मिळण्यासाठी अनेकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली होती.
चारचाकी वाहने
दुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांच्या खरेदीतही उत्साह आहे. शहरातील एकाच दालनात ९० चारचाकींची विक्री झाली. एकूणच शहरातील विविध दालनांमधून २०० चारचाकींची विक्री झाल्याचा अंदाज आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीदेखील चारचाकींची विक्री झाली होती. विशेष म्हणजे एका दालनात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तासाठी २०० चारचाकींचे बुकींग असताना तेवढ्या प्रमाणात वाहने उपलब्ध झाली नाही. अन्यथा शुक्रवारी चारचाकी विक्रीचा आकडा आणखी वाढला असता.
एलईडीला मागणी वाढली
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात लगबग होती. यंदा एलईडीला जास्त मागणी असून त्या खालोखाल वाशिंग मशिन, होेम थिएटर, रेफ्रिजरेटर यांना मागणी आहे. बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशी खरेदी करून अनेकांनी मुहूर्त साधला.