अमळनेरचा रथोत्सव परंपरा पाळत साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 22:34 IST2021-05-23T22:34:09+5:302021-05-23T22:34:50+5:30
संत सखाराम महाराजांचा जयघोष करीत कोविडचे नियम पाळून अमळनेरचा रथोत्सव २३ रोजी वैशाख एकादशीला जागेवरच साजरा करण्यात आला.

अमळनेरचा रथोत्सव परंपरा पाळत साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : संत सखाराम महाराजांचा जयघोष करीत कोविडचे नियम पाळून मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत अमळनेरचा रथोत्सव २३ रोजी वैशाख एकादशीला जागेवरच साजरा करण्यात आला.
अभय देव व आरती देव यांच्या हस्ते रथाची विधीवत पूजन करून लालजींची मूर्ती रथाच्या आसनावर विराजमान करण्यात आली. पाच वेळा पाच पाच पावले रथ मागे पुढे करून परंपरा पूर्ण करण्यात आली. केशव पुराणिक ,सुनील देव, जय देव यांनी पूजचे पौरोहि्त्य केले.
सखाराम महाराजांचे गादी पुरुष प्रसाद महाराज यांच्या हस्ते आरती करून रथ पुन्हा जागेवर भक्त निवासात नेण्यात आला. गर्दी होऊ नये म्हणून मंदिराच्या चहू बाजूला संस्थानतर्फे बॅरेकेटिंग व उंच पडदे लावण्याची काळजी घेण्यात आली होती. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, बाजार समिती संचालक हरी वाणी , नगरसेवक प्रवीण पाठक , माजी नगरसेवक गोपी कासार , विश्वस्त मंडळ हजर होते. रथाच्या पुढे मोहन बेलापूरकर महाराज यांची दिंडी जागेवरच माऊलीचा जयघोष करीत होती. रथावर व मंदिर परिसरात मुस्लिम बांधवांतर्फे मोफत विविधरंगी रोषणाई , लायटिंग करण्यात आली होती.