पारोळा येथे घरफोडी, चार तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 23:46 IST2021-04-19T23:45:55+5:302021-04-19T23:46:17+5:30
आईचे निधन झाल्याने आपल्या मूळ गावी पुढील विधीसाठी गेलेल्या पाटील कुटुंबीयांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.

पारोळा येथे घरफोडी, चार तोळे सोने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : आईचे निधन झाल्याने आपल्या मूळ गावी पुढील विधीसाठी गेलेल्या पाटील कुटुंबीयांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली व घरात असलेले चार तोळे सोने, आठ हजार रुपये रोख व एक एलईडी टीव्ही चोरून लंपास केल्याची घटना शहरातील भगवान भाऊनगर येथे घडली.
येथील राहुल राजेंद्र पाटील (भगवान भाऊनगर, पारोळा) यांनी फिर्याद दिली की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. याच्या पुढील धार्मिक विधीसाठी ते आपले मूळ गाव असलेले आडगाव (ता. पारोळा) येथे पारोळा येथील घर बंद करून गेले होते. दिनांक १९ रोजी तेराव्याचा कार्यक्रम संपला.
कार्यक्रम आटोपून दुपारच्या सुमारास त्यांचे सासरे रस्त्याने जात असताना घराकडे बघितले असता घराचा दरवाजा उघडा होता. याबाबत चौकशी केली असता घरात मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून घरात असलेले कपाटातील चार तोळे सोने, आठ हजार रुपये रोख, एलईडी टीव्ही साहित्य घेऊन पसार झाले. घरातील वस्तूंची नासधूस केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.