लाचखोरीत ‘महसूल विभाग’च अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:42 IST2019-11-05T11:42:10+5:302019-11-05T11:42:58+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : पोलीस दुसऱ्या तर महावितरण तिसºयास्थानी

लाचखोरीत ‘महसूल विभाग’च अव्वल
सुनील पाटील
जळगाव : सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारात महसूल विभागाने यंदा प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दुसºया स्थानी पोलीस तर महावितरण तिसºया स्थानी आहे. गेल्या वर्षी महसूल व पोलीस दोघंही विभाग बरोबरीत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईची आकडेवारी ‘लोकमत’ ला प्राप्त झाली आहे. यंदा वर्ग एकचा मत्सविभागाचा मोठा मासाही जाळ्यात अडकला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालवाधीत जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहांतर्गत शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये एसीबीने बॅनर्स व भीत्तीपत्रके तसेच बस स्थानक व गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा बसावा, त्याविरुध्द नागरिकांनी आवाज उठवून एसीबीकडे तक्रार करावी यासाठीच हे अभियान राबविण्यात आले.
यंदा महसूल विभागाचे ६ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. गेल्या वर्षी याच विभागाचे पाच जण जाळ्यात अडकले होते. पोलीस दलाचेही पाच कर्मचारी लाच घेतांना पकडले गेले. शिक्षण विभागाचेही दोन जण जाळ्यात अडकले. गेल्या वर्षी ३० जण तर यंदा १० महिन्यात २७ जण एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती या विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी ‘लोकमत’ ला दिली.
भ्रष्टाचाराविरुध्द लढ्यात नागरिकांनी सहभागी होऊन कोणतीही भीती न बाळगता लाच मागणाऱ्यांविरुध्द तक्रार द्या. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. उत्पन्नापेक्षा जास्त किंवा अवैध मार्गाने कोणी संपत्ती गोळा केली असेल तर त्याचीही तक्रार करु शकतात. -जी.एम.ठाकूर, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग