"आमचा प्रेमविवाह मर्जीने, पण आता आईकडे जायचंय"; पतीला झालेल्या मारहाणीनंतर तरुणीचा धक्कादायक जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:46 IST2026-03-23T15:46:18+5:302026-03-23T15:46:41+5:30

भुसावळमध्ये प्रेमविवाहाचा सूड उगवण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाची नग्न धिंड काढली होती.

Bhusawal Crime We Married for Love Brutalized Youth Wife Records Statement Returns to Parents | "आमचा प्रेमविवाह मर्जीने, पण आता आईकडे जायचंय"; पतीला झालेल्या मारहाणीनंतर तरुणीचा धक्कादायक जबाब

"आमचा प्रेमविवाह मर्जीने, पण आता आईकडे जायचंय"; पतीला झालेल्या मारहाणीनंतर तरुणीचा धक्कादायक जबाब

Bhusawal Crime: भुसावळमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका २५ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ करण्यात आला. केवळ मारहाण करून न थांबता, मुलीच्या नातेवाइकांनी तरुणाला विवस्त्र करून त्याची गावात धिंड काढली आणि गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मात्र आता तरुणीने दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

खडका येथील रहिवासी असलेल्या चेतन जंगले या तरुणाने एका १८ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. हे दोघेही एकाच समाजाचे असले, तरी मुलीच्या घरच्यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. शुक्रवारी सकाळी जेव्हा चेतन आपल्या पत्नीसह मामाच्या घरी थांबला होता, तेव्हा मुलीच्या नातेवाइकांनी १०-१२ जणांच्या टोळक्यासह तिथे धडक दिली.

सुरुवातीला धमकावल्यानंतर या टोळक्याने रागाच्या भरात चेतनवर हल्ला चढवला. त्याचा रुमालाने गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न झाला. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र नराधमांनी त्याला पकडून कपडे फाडले आणि नग्न अवस्थेत बेदम मारहाण केली.

गावातून काढली धिंड

हल्लेखोरांचे मन एवढ्यावरही भरले नाही. त्यांनी जखमी चेतनला दुचाकीवर बसवून खडका गावात नेले. तिथे बसस्थानकापासून घरापर्यंत त्याची विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली. या दरम्यान त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात आली आणि घर जाळून टाकण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. अखेर ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्यानंतर त्याची या छळातून सुटका झाली.

पाच जणांना बेड्या; मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत कोमल पाटील, हेरंब चौधरी, संजय बढे, विजय पाटील आणि ज्ञानेश्वर भोई या पाच संशयितांना अटक केली आहे. इतर १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहे.

तरुणीचा पोलिसांत जबाब

दरम्यान, रविवारी संबंधित तरुणी आपल्या आईसह पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने आपण स्वखुशीने लग्न केल्याचे मान्य केले असले, तरी सध्या आईकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पतीने सोसलेल्या अमानुष छळाची कबुलीही तिने आपल्या जबाबात दिली आहे. त्या तरुणावर आपण प्रेम करत असून त्याच्याशी स्वखुशीने विवाह केला आहे. परंतु आता आपली आईकडे जाण्याची इच्छा आहे, असं तरुणीने सांगितले.

दरम्यान, हल्ल्यात चेतनचा हात मोडला असून त्याच्या शरीरावर किमान २० ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title : प्रेम विवाह बना हिंसा: दूल्हे पर अत्याचार, दुल्हन अब माँ के पास!

Web Summary : भुसावल में प्रेम विवाह करने पर एक व्यक्ति को ससुराल वालों ने प्रताड़ित किया। उसे निर्वस्त्र कर घुमाया और जान से मारने की कोशिश की गई। दुल्हन ने प्रेम विवाह स्वीकार किया, लेकिन अब वह अपनी माँ के साथ रहना चाहती है। पांच गिरफ्तार, अन्य संदिग्धों की तलाश जारी।

Web Title : Love Marriage Turns Violent: Groom Tortured, Bride Now Wants Mother

Web Summary : In Bhusawal, a man was brutally tortured for marrying against his in-laws' wishes. Stripped and paraded, he was nearly killed. The bride admitted to a love marriage but now desires to live with her mother. Five arrests were made, and police are searching for more suspects.