दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी; वकिलाची तब्बल २१ लाख रुपयांची सायबर फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:00 IST2025-11-20T18:00:15+5:302025-11-20T18:00:30+5:30
जळगावमध्ये एका वकिलाची २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी; वकिलाची तब्बल २१ लाख रुपयांची सायबर फसवणूक!
Jalgaon Cyber Crime : फेसबुक गुंतवणुकीची जाहिरात दिसली अन् तिला क्लिक करताच लिंक ओपन होऊन मोठ्या परताव्याचे अमिष दिसले. त्याला बळी पडून एका वकिलाची २१ लाख ५२ हजार ३६५ रुपयांमध्ये फसवणूक झाली. हा प्रकार १ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडला. भुसावळ येथील अॅड. विवेक पाटील (४९) हे १ ऑक्टोबरला फेसबुक पाहत असताना त्यांना गुंतवणुकीविषयी ही जाहिरात दिसली.
पाटील यांनी युपीआयद्वारे ती रक्कम जमा केली. ती रक्कम वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतविल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कारणांनी रक्कम जमा करण्यास सांगितले व त्यानुसार अॅड. पाटील यांनी वेळोवेळी एकूण २१ लाख ५२ हजार ३६३ रुपये पाठविले.
दामदुप्पटचे आमिष
कंपनीत जेवढी गोल्ड गुंतवणूक कराल त्याच्या दामदुप्पट फायदा होईल, असे अॅड. पाटील यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी त्यांचे नवीन टेलिग्राम खाते उघडले. त्यावर आलेल्या मेसेजनुसार पाटील हे माहिती देत गेले. हे सर्व झाल्यानंतर कंपनीचा सिनियर मॅनेजर नोमन याचा कॉल आला व त्याने १९ हजार १६३ रुपये भरण्यास सांगितले.
३१ लाखाचा नफा दिसू लागला
वेळोवेळी पाठविलेल्या रकमेनंतर अॅड. पाटील यांना त्यांच्या प्रोफाईलवर एकूण ३१ लाख ६८ हजार रुपये नफा झाल्याचे दिसत होते. मात्र ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती. त्यांनी वरील दोघांशी संपर्क केला असता ती रक्कम ट्रेडमध्ये असून ती काढता येणार नसल्याचे सांगितले.
पैसे संपल्याचे सांगूनही दिली नाही रक्कम
तुमचा ट्रेड मायनसमध्ये गेला आहे, असे सांगून तुम्ही जर पैशाची मागणी केली तर तुमचे खाते दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकू अशी अॅड. पाटील यांना धमकी देण्यात आली. ही रक्कम हवी असल्यास अजून गुंतवणूक करा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र पैसे संपल्याचे सांगूनही भरलेली रक्कम परत मिळाली नाही. या प्रकरणी अॅड. पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन व नोमन नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.