पक्ष्यांच्या घरट्यांवरुन जळगावात सरासरी पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:26 IST2018-06-04T14:26:11+5:302018-06-04T14:26:11+5:30
यंदा पक्ष्यांची घरटी वृक्षाच्या मध्यावर आढळून येत असल्याने यंदा सरासरी पाऊस होण्याचा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे.

पक्ष्यांच्या घरट्यांवरुन जळगावात सरासरी पावसाचा अंदाज
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.४ : यंदा पक्ष्यांची घरटी वृक्षाच्या मध्यावर आढळून येत असल्याने यंदा सरासरी पाऊस होण्याचा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात रोहण्या बरसू लागल्या आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी पक्ष्यांचा घरट्यांवरुनच संपूर्ण हंगामात पावसाची स्थिती कशी राहील असा अंदाज लावत असतो. आजच्या डिजीटल व तंत्रज्ञानाच्या युगात देखील शेतकरी बांधव याच आधारवर पावसाचा अंदाज लावून आपल्या शेतीचे नियोजन आखतात. पक्षीमित्रांकडून पक्ष्यांचा घरट्यांची स्थितीचे निरीक्षण करण्यात येत असून, यंदा बऱ्याचशा पक्ष्यांची घरटी ही वृक्षाच्या मधल्या भागात असल्याची आढळून येत आहेत. त्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट व भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसारदेखील यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
असा लावला जातो अंदाज
पावसाळ्याचा तोंडावर पक्ष्यांकडून घरटी बांधण्याचे काम सुरु होत असते. पक्ष्यांची घरटी जर वृक्षाच्या वरच्या भागात असतील तर हंगामात पाऊस कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. जर पक्षी आपली घरटीवृक्षाच्या खालच्या भागातील खोडात किंवा फांद्यांच्यामध्ये तयार केल्यास त्या हंगामात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असतो. मात्र, यंदा पक्ष्यांची घरटी ही वृक्षाच्या खालच्या किंवा सर्वाेच्च भागात नसून मधल्या स्थितीत असल्याने सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे.
कावळा व कोकीळचा पाठशिवणीचा खेळ सुरु
नैऋत्य मौसमी वारे सुरु झाल्यानंतर बगड्याची पांढरी पिसे ही बदामी रंगाची होतात, त्यानुसार लवकरच पावसाला सुरुवात होईल असा संकेत आहे. सध्या बगळ्याची पिसे बदामी रंगाची होताना दिसून येत आहेत. तसेच कावळा व कोकीळचा पाठशिवणीचा खेळ देखील सुरु झाला आहे.
पावसाळ्याचा तोंडावर पावश्या नावाचा पक्षी आढळून आल्यानंतर शेतकºयांची पेरणी साठी लगबग सुरु होते. असेही म्हटले जाते.
दरवर्षी मे अखेर व जून च्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णात नवरंग (इंडीयन पीट्टा) हा पक्षी दाखल होत असतो. त्याचे आगमन झाल्यावर पाऊस देखील दाखल होतो. सध्या जिल्ह्णात अनेक ठिकाणी नवरंग पक्षी आढळून आल्याची माहिती पक्षीमित्र राहुल सोनवणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आधी हवामान विभागासारखी यंत्रणा नसल्याने पक्ष्यांचा हालचालींवरून हवामानाच्या स्थितीचा अंदाज लावला जात होता. त्यात पक्ष्याच्या घरट्यांवरून देखील अंदाज लावला जात होता. आजही ग्रामीण भागात याच आधारावर पावसाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. यावर्षी पक्ष्यांचा घरांची पाहणी केली असता वृक्षांच्या मधल्या भागात घरटी बांधण्याचे काम सुरु आहे. त्यावरुन यंदा सरासरी पाऊस होण्याची शक्यता आहे.
-आश्विन पाटील, पक्षीमित्र
पक्ष्यांचा घरट्यांची स्थितीचे निरीक्षण सध्या सुरु आहे. आतापर्यंत केलेल्या पाहणीत वृक्षांच्या खालच्या व मधल्या भागातच पक्षी घरटी तयार करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे यंदा कमी पाऊस होणार नाही हे निश्चित आहे. सरासरी किंवा समाधानकारक पावसाचा अंदाज सध्याचा पक्ष्यांचा हालचालींवरून दिसून येत आहे.
-राहुल सोनवणे, पक्षीमित्र