जिल्ह्यातील वाघ वन विभागाने सोडले वाऱ्यावर : बैठकांचा नुसता फार्स : मेळघाट ते अनेरपर्यंतचा कॉरिडॉरचा प्रस्ताव धूळ खात; वन विभागाची अनास्था
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील पाल अभयारण्यात काही दिवसांपूर्वी पट्टेदार वाघाचे दर्शन झाले असून, याआधी देखील वढोदा वनक्षेत्रात व लंगडा आंबा परिसरात वाघाचे दर्शन झाले आहे. जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व वेळोवेळी सिध्द होत असताना देखील वन विभागाकडून वाघांच्या संवर्धनासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसून येत नाही.
९ वर्षांपासून मेळघाट ते मुक्ताई-भवानी वनक्षेत्र ते अनेरपर्यंत व्याघ्र कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा झाली आहे. मात्र, वन विभागाच्या उदासीन धोरणामुळे हे काम थांबले असून, वन विभागाला साधा डीपीआर देखील तयार करता आलेला नाही. वन विभागाच्या या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील वाघ वाऱ्यावर सोडले गेले आहेत.
जळगाव वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या १५ हजार जंगल क्षेत्रातील मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा, चारठाणा, डोलारखेडा भागात १२ वाघांचा वावर होता. मात्र आता या भागात केवळ ४ ते ५ वाघ उरले आहेत, तर काही वाघ हे नियमित संचार करत असतात. या भागातही वाघ जगवायचे असतील, तर यावल, अनेर डॅम अभयारण्य क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये जळगाव वन विभाग व सातपुडा बचाव समितीने तयार करून अंतिम मान्यतेसाठी नाशिक वन्यजीव विभागाकडे पाठवला होता. मात्र, सात वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडल्यानंतर नाशिक वन विभागाने देखील यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
समितीच्या बैठका सुरूच, प्रस्ताव मात्र नाही
दीड वर्षापूर्वी या कॉरिडॉरसाठी वन विभागाची बैठक झाली होती. या बैठकीत पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी दहा जणांची समिती देखील तयार करण्यात आली होती. मात्र, वन विभागाकडून अद्यापही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. मात्र, अनेकवेळा केवळ बैठकाच सुरू असून, तोडगा मात्र काढता आलेला नाही. मेळघाट - अनेरदरम्यानच्या व्याघ्र कॉरिडॉरबाबत २०१३ पासून हा प्रस्ताव पडून होता. त्यानंतर नव्याने समिती गठित झाल्यानंतर या प्रस्तावाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, वन विभाग याबाबत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही.
जेव्हा वाघांचे अस्तित्व नाहीसे होणार, तेव्हा कॉरिडॉर होणार का ?
मुक्ताई-भवानी परिसरात ८ वाघ असल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तविण्यात येते. मात्र, या भागात वेडी बाभूळ या वनस्पतीची वाढत जाणारी संख्या यामुळे हरिण, नीलगाय या तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या या भागातून कमी होत आहे. त्यामुळे या भागातील वाघ देखील विस्थापित होत आहेत. अनेकदा या भागातील वाघ शिकारीच्या शोधात केळीच्या बागांमध्ये पोहोचला होता. त्यामुळे गवताच्या कुरणाचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. नीलगाय व हरणांची संख्या वाढवून वाघांच्या शिकारीला पोषक वातावरण उपलब्ध करणे गरजेचे आहे. तसेच मेळघाट व मुक्ताई-भवानीदरम्यानचा बफरझोन तयार करून, वाघांचा संचार मार्ग होणे गरजेचे आहे. मात्र, वन विभागाच्या सध्या दिसून येणाऱ्या उदासीन धोरणामुळे जेव्हा या भागातील वाघांचे अस्तित्व पूर्णपणे नाहीसे होईल, तरीही वन विभागाला जाग येणार नाही असेच दिसून येते.
मंजुरी मिळाली आहे, मात्र प्रस्तावच नाही
मेळघाट ते अनेर डॅमपर्यंत सुमारे २३४ कि.मी.च्या कॉरिडॉरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गेल्यावर्षी राज्याचे तत्कालीन वन्यजीवचे अप्पर मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी मुक्ताईनगरातील मुक्ताई-भवानी व डोलारखेडा भागात जाऊन संचारमार्गाची पाहणी केली होती. या कॉरिडॉरमध्ये ६२ हजार ८३९ हेक्टर जंगलाचे क्षेत्र येणार आहे. तसेच याबाबत लिमये यांनी वन विभागाला याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, वन विभागाने प्रस्तावच तयार करून दिलेला नाही.
कोट..
वाघांचा बचाव करण्यासाठी वाघांचे संचारमार्ग कायम ठेवणे गरजेचे आहे. मेळघाट ते अनेक डॅमपर्यंत वाघांच्या संचारमार्गासाठी कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये देण्यात आला होता. आता नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात ८ पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी शासनासह वन विभागाने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- अभय उजागरे, सदस्य, जैवविविधता समिती, जळगाव