फायनन्समधून ६६ लाखांचे कर्ज लाटले; तीन जणांविरुद्ध गुन्हा
By चुडामण.बोरसे | Updated: September 3, 2022 20:57 IST2022-09-03T20:57:00+5:302022-09-03T20:57:37+5:30
मुक्ताईनगर : भारत फायनान्समधील प्रकार

फायनन्समधून ६६ लाखांचे कर्ज लाटले; तीन जणांविरुद्ध गुन्हा
मुक्ताईनगर जि. जळगाव : शहरातील भारत फायनान्स कंपनीच्या सदस्यांचे अंगठे घेऊन तब्बल ६६ लाखांचे कर्ज लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाखेचा फिल्ड असिस्टंटसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिल्ड असिस्टंट निखिल राजेंद्र सावकार (५४, रा. एम.डी.एस. कॉलनी, जळगाव), अवधूत ज्ञानेश्वर सोनवणे (रा. रेलगाव, फुलंब्री,जि. औरंगाबाद) आणि पंकज रामधन वानखेडे (रा. शेळगाव मुकुंद, ता. चिखली, जि.बुलढाणा) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तीनही जणांनी संगनमत करून २४७ सदस्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने अंगठे घेतले आणि तब्बल ६६ लाख ६६ हजार रुपये कर्जाचे वाटप केल्याचे भासवले. १ सप्टेंबर २०२१ ते १५ मे २०२२ या दरम्यान हा अपहार घडला. या संदर्भात फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक एकनाथ भीमगीर गोसावी (रा. चाळीसगाव) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन वरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.