तपासाची कार्यपद्धत बदलविताच सापडल्या चोरीच्या ४९ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:46+5:302021-08-20T04:20:46+5:30
जळगाव : दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना व त्या तुलनेत गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण पाहता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे ...

तपासाची कार्यपद्धत बदलविताच सापडल्या चोरीच्या ४९ दुचाकी
जळगाव : दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना व त्या तुलनेत गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण पाहता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मे महिन्यापासून दुचाकी चोरीच्या तपासाची कार्यपद्धत बदल केली. त्याचे फलित म्हणून ४९ दुचाकी शोधण्यास पोलिसांना यश आले. याआधीच्या तीन महिन्यात अवघ्या दहा दुचाकी पोलिसांना सापडल्या होत्या. दरम्यान, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४७० दुचाकी चोरी झाल्या तर १६४ दुचाकींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्याची कार्यपद्धत बदल केल्यानंतर त्यात प्रगती दिसून आली आहे.
दुचाकी चोरीची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला असेल, तर पोलीस ठाणे पातळीवर संबंधित बीट अंमलदाराकडे त्याचा तपास दिला जात होता. या अंमलदाराकडे आधीचे गुन्हे, बीटमधील जबाबदारी, बंदोबस्त याचा विचार करता या दुचाकी चोरीचा तपास गांभीर्याने होत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून दुचाकी चोरीच्या घटनाही वाढत होत्या व चोरट्यांची हिंमतही वाढत चालली होती. काही वेळा गुन्हाही दाखल करण्यास टाळाटाळ होऊन केवळ अर्जावर काम भागविले जात होते. त्यामुळे तपासच होत नव्हता. याच मुद्यावर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मे महिन्यात बोट ठेवले आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीचा तपास हा एकाच अमलदारांकडे देऊन त्याचा दरमहा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम असा झाला की, दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येऊ लागल्या.