जळगावात एटीएम कार्ड बदल करुन ४२ हजाराचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:10 IST2018-09-21T13:10:02+5:302018-09-21T13:10:37+5:30
निवृत्त शिक्षकाची फसवणूक

जळगावात एटीएम कार्ड बदल करुन ४२ हजाराचा गंडा
जळगाव : एटीएम कार्डची अदलाबदल करुन दोघा संशयितांनी हिरोजी बाबुराव पाटील (वय ७३, रा. सोनाळा, ता.जामनेर) या सेवानिवृत्त शिक्षकाच्या बॅँक खात्यातून ४२ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिरोजी पाटील हे १८ सप्टेंबर रोजी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जळगाव शहरात आले होते. सकाळी पावणे दहा वाजता स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये गेले असता मशीनमध्ये कार्ड टाकले व दहा हजार रुपयाचा आकडा टाकला, मात्र रक्कम मशीनच्या बाहेर आली नाही. त्यानंतर पुन्हा कार्ड मशीनमध्ये टाकून ५ हजाराचा आकडा टाकला तरीही रक्कम निघाली नाही. त्यावेळी मागे थांबलेल्या दोघांनी ४ हजार रुपयांचा आकडा टाकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रयत्न केले असता ४ हजार रुपये मशीनमधून निघाले. तीन वेळा मिळून १२ हजार रुपये पाटील यांनी काढले. यावेळी हातचलाखी करुन या दोन जणांनी पाटील यांच्याजवळील एटीएम कार्ड घेऊन त्यांच्याजवळील एटीएम कार्ड पाटील यांना दिले.
दुसऱ्या दिवशी उघड झाला प्रकार
पैसे काढल्यानंतर पाटील डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले. तेथून ते कुसुंबा येथे पुतण्याकडे गेले. दुसºया दिवशी पुतण्याला एटीएम कार्ड देऊन परत पैसे काढायला पाठविले असता ते एटीएम कार्ड चंदूराम नावाच्या व्यक्तीचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यातून पैसे निघाले नाहीत. पाटील सोनाळा येथे बॅँकेत चौकशी केली असता शहरातील बेंडाळे चौकातील एटीएममधून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले.