२२ वर्षीय इंजीनिअर तरुण नोकरीसाठी पुण्यात आला अन् भीषण अपघातात जागीच मृत्यू; कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:22 IST2025-03-10T16:22:13+5:302025-03-10T16:22:43+5:30
शनिवारची सुटी असल्याने एका कामानिमित्त जात असताना सासवड येथे अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

२२ वर्षीय इंजीनिअर तरुण नोकरीसाठी पुण्यात आला अन् भीषण अपघातात जागीच मृत्यू; कुटुंबावर शोककळा
Pune Accident: पुणे येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या पैकी एक तरुण हा फैजपूर, ता. यावल येथील तर दुसरा तरुण हा खिर्डी ता. रावेर येथील रहिवासी होता.
फैजपूर शहरातील पेहेड वाड्यातील रहिवासी भावेश सुरेंद्र चौधरी (२२) या तरुणाचे ८ रोजी शनिवारी पुणे (सासवड) येथे अपघाती निधन झाले. भावेश दुचाकीवरून जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला धडक बसून भावेशचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होऊन सहा महिन्यांपूर्वीच तो पुणे येथे नोकरीस लागला होता. शनिवारची सुटी असल्याने एका कामानिमित्त जात असताना सासवड येथे अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर फैजपूर येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
खिर्डी येथील शुभमच्या दुचाकीस ट्रॅक्टरची धडक
खिर्डी, ता. रावेर : पुणे येथे अभियंता असलेल्या शुभम वसंत पाटील या ३० वर्षीय युवकाचा पुणे येथील रावेत भागात ६ रोजी आपघाती मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने शुभम गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, रावेत पोलिसात आरोपी ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर ग्वानाप्पा मुदगल (वय २४, रा. मस्केवस्ती, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभमवर ७ रोजी खिर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील तो एकुतलता मुलगा होता. पश्चात पत्नी, आई, वडील, असा परिवार आहे