बोहरा येथील १७६ अंशतः बाधित कुटुंबांचे स्थलांतर करण्यात यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:17+5:302021-08-26T04:20:17+5:30
अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथील निम्न तापी प्रकल्पातील टप्पा दोनमधील अंशतः बाधित घोषित असलेल्या १७६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे ...

बोहरा येथील १७६ अंशतः बाधित कुटुंबांचे स्थलांतर करण्यात यावे!
अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथील निम्न तापी प्रकल्पातील टप्पा दोनमधील अंशतः बाधित घोषित असलेल्या १७६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी रिपाइं आंबेडकर गटाने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोहरे हे गाव तापी व बोरी नदी संगमावर असून, तापी नदी अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. तापी नदी पूर्व-पश्चिम वाहते, तर बोरी नदी दक्षिणोत्तर वाहते व समोरून अनेर नदी येऊन मिळते यामुळे पाण्याचा प्रवाह बोहरा गावाजवळ येऊन मिळतो. निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचे काम १३९.४ मीटरपर्यंत झाले असल्याने बॅक वॉटर वाढले आहे, तसेच हतनूर धरणाचे दरवाजे उघडले की पाण्याची पातळी वाढून काठावरील लोकवस्तीला धोका निर्माण होतो. नागरिक जीव मुठीत धरून असतात. गावाच्या १७६ कुटुंबांना प्रकल्पात अंशतः बाधित घोषित केले आहे. २००६ मध्ये पुरामुळे गावाला पाण्याचा वेढा पडला होता. कुटुंबांना व जनावरांनादेखील तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन ताबडतोब करण्यात यावे अन्यथा भविष्यात माळीण व तळीवे गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे निवेदनात म्हटले असून, निवेदनावर पीतांबर वाघ, भगवान संदानशिव, अरुण घोलप, यशवंत बैसाने, पंकज सोनवणे, गणेश पवार, सोपान धनगर, छन्नू मोरे, देवीदास फुलपगारे, चंद्रकांत कोळी, उत्तम धनगर, सचिन पाथरवट, रूपचंद धनगर, सतीश सैंदाणे, किरण बच्छाव, विनोद मोरे, गोविंदा भिल, संजय भिल, भरत भिल, धीरज कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.