जालन्यातून पिस्तूलाच्या धाकावर अपहरण झालेल्या युवकाचा खून; मृतदेह फेकला बुलढाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:45 IST2025-06-30T16:40:35+5:302025-06-30T16:45:01+5:30

बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव-टाकरखेडा रोडवरील एका शेतात मृतदेह आढळून आला.

Youth kidnapped at gunpoint from Jalna murdered; Body dumped in Buldhana | जालन्यातून पिस्तूलाच्या धाकावर अपहरण झालेल्या युवकाचा खून; मृतदेह फेकला बुलढाण्यात

जालन्यातून पिस्तूलाच्या धाकावर अपहरण झालेल्या युवकाचा खून; मृतदेह फेकला बुलढाण्यात

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३, रा. राजा टाकळी) यांचा जुन्या वादातून गावठी पिस्तूल व कुऱ्हाडीच्या धाकावर अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. खून केल्यानंतर सुरेश आर्दड यांचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यात नेऊन फेकला. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास, कुंभार पिंपळगाव बाजार समितीसमोरून सुरेश आर्दड (वय ३३, रा. राजा टाकळी) यांचे चार जणांनी अपहरण केले होते. गावठी पिस्तूल व कुऱ्हाडीच्या धाकावर सुरेश यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून अज्ञात दिशेने नेण्यात आले. रविवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव-टाकरखेडा रोडवरील एका शेतात सुरेश यांचा मृतदेह आढळून आला.

चार आरोपींवर गुन्हा दाखल
याप्रकरणी फिर्यादी सुभाष लळितराव आर्दड (सुरेश यांचे चुलत भाऊ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हरी कल्याण तौर, सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (दोघेही रा. राजा टाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (रा. कुंभार पिंपळगाव) आणि एक अज्ञात चालक, या आरोपींविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश आर्दड याचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. याबाबत किनगावराजा पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून उत्तरीय तपासणी केली. यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: Youth kidnapped at gunpoint from Jalna murdered; Body dumped in Buldhana