'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:42 IST2025-09-13T17:41:17+5:302025-09-13T17:42:19+5:30

मराठा समाज संख्येने ५०-५५ टक्के आहे, त्यांना १० टक्के आरक्षण कसे पुरेसे होईल?"

'You try to change the GR, then you will understand the Marathas'; Manoj Jarange's warning | 'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

वडीगोद्री (जालना): "तुम्ही जीआरमध्ये फेरफार करा, शब्द प्रयोग बदला आणि मग बघा तुम्हाला मराठे कळतील आणि आंदोलनही कळेल," असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते शनिवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना थेट प्रश्न विचारला. ते म्हणाले, "छातीवर हात ठेवून बोला, तुम्ही हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर समाधानी आहात का? तुम्हाला तरी ओबीसींचा नेता म्हणून ते (भुजबळ) धरतात का? आम्ही तुम्हाला काही शब्दाने दुखावले आहे का? तुमचा ओबीसींचा नेता होण्याचा किती अट्टहास आहे? आमची तर इच्छा आहे की, तुमच्यासारखा हुशार नेता ओबीसींचा नेता व्हावा, पण ते तुम्हाला होऊ देतात का?" भुजबळांवर टीका करताना जरांगे म्हणाले, "वडेट्टीवार यांनी भुजबळांची बाजू ओढू नये. ते इतके पारदर्शक नेते नाहीत. तुमची प्रतिमा चांगली आहे, ती त्यांच्यामुळे उगाच मलीन कशाला करता?"

तुम्ही दंगली घडवून आणाल का?
जरांगे यांनी भुजबळांवर गंभीर आरोप करत म्हटले की, "तुमच्या एका वक्तव्यानंतर मराठा नेते काहीसे शांत झाले आहेत. पण शांतता म्हणजे अराजकता नाही. तुमचा एक शब्द होता, ‘अराजकता माजेल’. तुम्ही अराजकता माजवाल म्हणजे दंगली घडवून आणाल का? आम्हाला माहीत आहे तुम्ही किती शहाणे आहात. तुमच्याच लोकांनी दंगली घडवून आणल्या आहेत."

माणूस म्हणून सरपंच देखील होऊ शकत नाही
भुजबळ यांचा 'ओबीसी-मराठा संघर्ष शांत झाला पाहिजे' या वक्तव्यावर जरांगे यांनी म्हटले की, "ते संघर्ष शांत होऊ देतील का? कारण, त्याच्याशिवाय त्यांची राजकीय पोळी भाजत नाही. ते कोणत्याही पक्षातून आमदार होतात, मंत्री होतात, ते फक्त ओबीसीचं नाव सांगून. माणूस म्हणून ते सरपंच सुद्धा होऊ शकत नाही इतकी त्यांची नियत खराब आहे."

ओबोसी आरक्षण आमच्या हक्काचे
जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाला दोन-तीन आरक्षणे असल्याच्या आरोपावरही उत्तर दिले. "आम्ही आधीच ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी करत आहोत, मग हा मुद्दा कसा येतो? मराठा समाज संख्येने ५०-५५ टक्के आहे, त्यांना १० टक्के आरक्षण कसे पुरेसे होईल?" असा सवाल त्यांनी केला. शिवाय आम्ही वारंवार सांगत आहोत की, ५० टक्क्यांच्यावर गेलेले आरक्षण टिकत नाही. देणारे तेच आहेत आणि घेणारे तेच आहेत,  सगळे सरकारचेच लोक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण हे आमच्या हक्काच आहे.

Web Title: 'You try to change the GR, then you will understand the Marathas'; Manoj Jarange's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.