राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:12 IST2025-03-03T16:12:21+5:302025-03-03T16:12:55+5:30
अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; धुळे ते सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री डाव्या कालव्याजवळील घटना

राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा विरुद्ध दिशेने येणाऱ्या उसाच्या बैलगाडीस दुचाकी धडकल्याने मृत्यू झाला. चैतन्य वैद्यनाथ जायभाये ( २०, काकडहिरा ता. पाटोदा जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर आज सकाळी ( दि. ३ ) ७ वाजेच्या दरम्यान वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.
पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे आज सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा होती. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी चैतन्य आज पहाटे साडेपाच वाजता काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर ( क्रमांक एम.एच.२३ बी.डी.५०८८) निघाला. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीसोबत दुचाकीची जोरदार धडक झाली. यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुचाकीचा चुराडा झाला
उसाची बैलगाडी आणि दुचाकीची जोरदार अपघात झाल्यानंतर चैतन्य गंभीर जखमी झाला. तर दुचाकी चकानाचूर झाली. चुकीच्या दिशेने आलेल्या ऊस टायरगाडीमुळे अपघात होऊन चैतन्यचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी वार्ता समजताच जायभाये कुटुंब व काकडहिरा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.