भोकरदनमध्ये हॉटेलसमोर जादूटोणा; प्रतिष्ठित नागरिक, पोलिसांच्या नावाच्या चिठ्ठ्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:12 IST2026-02-04T16:10:34+5:302026-02-04T16:12:02+5:30
सीसीटीव्ही फुटेजने उघड केला महिलेचा प्रताप; पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

भोकरदनमध्ये हॉटेलसमोर जादूटोणा; प्रतिष्ठित नागरिक, पोलिसांच्या नावाच्या चिठ्ठ्याने खळबळ
जालना : चेहऱ्यावर मास लावून आलेल्या अज्ञात महिलेने भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे पाटीवरील हॉटेल शिवनेरीसमोर हळद-कुंकू, लिंबू, बाहुले ठेवून गावातील प्रतिष्ठीत लोकांसह पोलिसांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून जादूटोण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला.
या प्रकरणी कृष्णा भानुदास ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबरे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा भानुदास ठोंबरे यांचे जवखेडा ठोंबरे पाटीवर शिवनेरी हॉटेल आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता कामगारांनी हॉटेल नेहमीप्रमाणे बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी कामगार हॉटेल उघडण्यासाठी आले असता, त्यांना हॉटेलसमोर हळद, कुंकु, लिंबू, एक बाहुले व गावातील प्रतिष्ठित लोकांच्या व पोलिसांच्या नावाच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यानंतर हॉटेलचे सीसीटीव्ही चेक केले असता, हॉटेलसमोर एक महिला जादूटोणा करत असल्याचे दिसून आली.
या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.