‘शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून जरांगेंचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:25 IST2025-09-16T19:22:21+5:302025-09-16T19:25:21+5:30
सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे मांडणार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे

‘शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून जरांगेंचा सरकारला इशारा
वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला थेट इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि आधार द्या, अन्यथा त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करू," असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. अंबड तालुक्यातील महाकाळा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
९ एकर तूर पाण्याखाली
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महाकाळा शिवारातील शेतकरी सोमनाथ लहाने यांच्या गट नंबर २२ मधील शेतात मोठे नुकसान झाले आहे. जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्याने लावलेली तब्बल ९ एकर तूर पाण्यात पूर्णपणे बुडाली असून, शेतातून खाली उतरणेही शक्य होत नाही, असे भयानक चित्र त्यांनी पाहिले. "शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे," असे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारला जागे केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माहिती देणार
या नुकसानीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. "मी सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे मांडणार आहे. सरकार जर याकडे दुर्लक्ष करेल तर त्यांच्यासाठी आपण शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारू," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.