जाफराबाद तालुक्यात ३२ गावांत ३६ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:46 IST2019-01-14T00:45:30+5:302019-01-14T00:46:13+5:30
पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे.

जाफराबाद तालुक्यात ३२ गावांत ३६ टँकरने पाणीपुरवठा
प्रकाश मिरगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. १०१ गावांपैकी आतापर्यंत फक्त ४३ गावात तात्पुरत्या उपाय योजना तयार करण्यात आल्या आहेत. तालुक्यात ३२ गावामध्ये ३६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, ११ गावासाठी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले. येणाऱ्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोजगार हमी योजनेतून २२५ मजुरांच्या हाताला काम देण्यात आले.
तालुक्यातील १२ गावातील पाणीटंचाई निवारण संदर्भात प्रस्ताव तयार करून पंचायत समितीस्तरावर सादर करण्यात आले आहेत. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ दोन पाणीटंचाई आराखडा बैठका येऊन गती देण्याचे काम केले असले तरी अपेक्षित अशी गती या कामी मिळताना दिसत नाही. दुष्काळ असतांना हाताला काम नसल्याने परिसरात काम उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
टँकर सुरू असलेली गावे
गोपी, डोलखेडा बु, सावरखेडा गोधन, मंगरूळ, माहोरा, जानेफळ, चिंचखेडा, येवता, पिंपळगाव कड, वडाळा, वरुड खु, धोंडखेडा, चापणेर, हिवराबळी, म्हसरूळ, सावरखेडा, वरखेडा विरो, देऊळगाव उगले, जवखेडा ठेंग, बोरखेडी गायकी, पिंपळखुटा, आरदखेडा, पाळल, भातोडी, काचनेरा, खानापूर, किन्ही, वाढोना तांडा, गाडेगव्हान, दहिगाव, भोरखेडा या गावांत ९ शासकीय, २७ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल
आसई, देऊळझरी, वरुड बु, हिवरा काबली, कोल्हापूर, बेलोरा, सवासनी, कोनड बु. या गावात १८ घरकुलांचे कामे सुरू आहे. या ठिकाणी १६२ मजूर काम करत आहेत.
पाणीटंचाईमध्ये प्रस्तावित गावे
टेंभुर्णी, दत्तनगर, सोनखेडा, कोल्हापूर, सवासनी, गोकुळवाडी, तपोवन गोंधन, निमखेडा खुर्द, सोनगिरी, भराखेडा, आंबेगाव, डोंणगाव, ही गावे प्रस्तावित आहेत.