निम्न दुधनातून पाणी उपसा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:31 IST2020-03-21T23:31:01+5:302020-03-21T23:31:29+5:30
निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

निम्न दुधनातून पाणी उपसा वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात जिवंत पाणीसाठा केवळ अडीच टक्के शिल्लक राहिला आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने या प्रकल्पात पाणी साठा क्षमतेने होऊ शकला नाही. गतवर्षी पूर्ण पावसाळ््यात हे धरण मृत साठ्यात होते. मात्र, परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे धरण मृत साठ्यातून बाहेर येऊन जिवंत पाणीसाठा १३ टक्के झाला होता. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच पूर्ण उन्हाळ््यात या धरणातून टँकरने जिल्हाभर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणातील पाणी भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे.
अवैध पाणी उपसा थांबवणे गरजेचे
निम्न दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत एकूण पाणीसाठा ३१ टक्के आहे, तर जिवंत पाणीसाठा केवळ २.५ टक्क्यांवर आला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या धरणातील पाणी उपसा थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामस्थांना उन्हाळ््यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.
निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच सिंचन क्षेत्रही आहे. मात्र, सततच्या उपशाने हे बॅक वॉटरही झपाट्याने खाली जात असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.