आकाशातून अज्ञात यंत्र शेतात कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ; यंत्राबाबत रंजक माहितीसमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:00 IST2025-12-05T13:08:11+5:302025-12-05T14:00:02+5:30
गावकऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

आकाशातून अज्ञात यंत्र शेतात कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ; यंत्राबाबत रंजक माहितीसमोर
भोकरदन (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे गुरुवारी सकाळी शेतकरी सत्यवान मिसाळ यांच्या शेतात आकाशातून एक अज्ञात उपकरण कोसळल्याने गावात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, प्रशासनाच्या तपासणीनंतर हे उपकरण हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे ‘वेदर सॉनड’ असल्याचे स्पष्ट झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
सत्यवान मिसाळ यांच्या शेतात सकाळी हे उपकरण पडलेले दिसले. या विचित्र आकाराच्या उपकरणाला पांढऱ्या, रबरासारख्या पिशवीची आणि लांबलचक दोरीची जोडणी केलेली होती. हे दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये काही काळ भीती आणि संभ्रम निर्माण झाला. अनेकांना हे एखादे संशयास्पद किंवा धोकादायक साहित्य वाटले; तर काहींनी ते ड्रोनचे अवशेष किंवा स्फोटक यंत्रासारखे असल्याचा कयास लावला. गावकऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली असता, हे उपकरण ‘वेदर सॉनड’ असल्याचे स्पष्ट झाले.
दररोज अशी अनेक उपकरणे आकाशात
‘वेदर सॉनड’ हे यंत्र तापमान, आर्द्रता, वायुदाब (प्रेशर) आणि हवामानाशी संबंधित इतर माहिती गोळा करण्यासाठी वापरले जाते. हे उपकरण मोठ्या बलूनसोबत आकाशात सोडले जाते. वातावरणाच्या उंच थरांमध्ये बलून फुटल्यानंतर हे हलके उपकरण वाऱ्याच्या दिशेने जमिनीवर कुठेही पडते. अशा प्रकारच्या यंत्रामध्ये कोणतेही धोकादायक रसायन किंवा स्फोटक पदार्थ नसतो. भारतातील हवामान विभाग तसेच काही खासगी संशोधन संस्था दररोज अशी उपकरणे आकाशात सोडतात. त्यामुळे ही उपकरणे शेकडो किलोमीटर लांब अनोळखी ठिकाणी पडणे ही एक सामान्य बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.