शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:27 IST2025-10-29T18:26:34+5:302025-10-29T18:27:13+5:30
'शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे!' मनोज जरांगे पाटील यांचा एकजुटीसाठी मोठा निर्णय

शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
वडीगोद्री (जालना): राज्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे मोठे आंदोलन सुरू असताना, शेतकऱ्यांची एकजूट कायम राहावी या भूमिकेतून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील नियोजित बैठक रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे, या भूमिकेवर त्यांनी ठाम राहायला हवे, असे मत जरांगे पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
'दोन जागेवर आंदोलन नको'
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नेत्यांसोबत २ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, सध्या नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. "शेतकरी आणि शेतकऱ्याचा जीव एकच दिसला पाहिजे. त्यामुळे सध्या दोन जागेवर आंदोलन नको. इकडे आंदोलन सुरू असताना इकडे बैठक घेणं शोभण्यासारखं नाही, ते माझ्या बुद्धीला पटत नाही." असे जरांगे पाटील म्हणाले.
नागपूरच्या आंदोलनानंतर पुढील दिशा
नागपूर येथील आंदोलनातून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर त्यानंतर आपण बैठक घेऊन सरकार मागण्या कशा मान्य करत नाही हे बघू, असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे.