मजुरी करून परतणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:59 IST2020-10-19T13:54:19+5:302020-10-19T13:59:25+5:30
हिसोडा गावातील चुली पेटल्या नाहीत

मजुरी करून परतणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले
जळगाव सपकाळ (जि. जालना) : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील हिसोडा ते जळगाव सपकाळ या रस्त्यावर शनिवारी रात्री घडली. रखमाजी त्र्यंबक पांडे (४५) व भानुदास तेजराव कोरडे (३२, दोघेही रा. हिसोडा, ता. भोकरदन) अशी मयताची नावे आहेत.
जालना जिल्ह्यातील हिसोडा गावातील रखमाजी पांडे व भानुदास कोरडे हे दोघे शनिवारी जळगाव सपकाळ येथे मजुरीसाठी गेले होते. सायंकाळी काम आटोपून दोघेही दुचाकीवरून गावाकडे येत होते. सायंकाळी सातच्या दरम्यान जळगाव सपकाळ ते हिसोडा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली आणि वाहनचालक वाहनासह फरार झाला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
दोघांनाही उपचारासाठी सिल्लोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. रखमाजी पांडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली तर भानुदास कोरडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, हिसोडा गावातील पांडे व कोरडे कुटुंबातील दोन कर्ते पुरूष गेल्यामुळे शनिवारी रात्री गावात एकही चूल पेटली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.